चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला यंत्रणेचा आढावा

0
15

चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता हेमंत हिंगोनिया यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. हिंगोनिया यांनी कोषागार कार्यालय येथील स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय येथे त्यांनी खर्च विषयाशी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी सर्व नोडल अधिकारी व खर्च व्यवस्थापनासंदर्भात उपस्थित इतर अधिकारी व कर्मचा-यांना निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली व अशा भागात विशेष उपाययोजना राबविण्याबाबत उत्पादन शुल्क विभाग, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचना दिल्या. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे. इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिध्द होणा-या जाहिरातींकडे लक्ष देण्याबाबत जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या नोडल अधिका-यांना दिले.

 

बैठकीला जिल्हास्तरीय खर्च व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील, यांच्यासह सर्व विधानसभा क्षेत्राचे सहायक खर्च निरीक्षक, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, बँक ऑफ इंडीयाचे व्यवस्थापक, सी-व्हीजील चे प्रतिनिधी, हेल्पलाईन सेंटरचे प्रतिनिधी व जिल्हा निवडणूक खर्चासंबंधी संपूर्ण टीमचे सदस्य उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी राहणार उपलब्ध : निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया (मो. 9404921146) हे खर्चाविषयक नागरिकांचे मत, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी ‘बकूल’ व्हीव्हीआयपी कक्ष, कौस्तुभ बिल्डींग, वन अकादमी येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत.

0000

जिल्हाभरात विविध उपक्रमातून मतदार जनजागृती

चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता पहिल्याच टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तसेच स्वीप उपक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात मतदार जनजागृती करण्यात येत आहे.

देशाचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. त्यामुळे मतदान करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, आपल्या एका मताचे महत्त्व कळावे, पैशांनी मते विकली जाण्याचा प्रकार कुठेही होऊ नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे. निवडणुकांच्या माध्यमातून देशाची लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आपले मत योग्य उमेदवारास देणे महत्त्वाचे आहे. याबाबतची नागरीक, तरुण – तरुणींमध्ये जनजागृती केली जात आहे. यात मतदानाचे महत्व विशद करणारी रांगोळी स्पर्धा, ‘मी मतदानाचा हक्क बजावणार’ याबाबत तरुणांसाठी स्वाक्षरी मोहीम, आदी उपक्रम राबविण्यात येत आहे.

ब्रम्हपूरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी लोकशाहीचे बळकटीकरण या विषयावर रांगोळी स्पर्धा, निवडणूक – 2024 या विषयावर केक सजावट स्पर्धा, तसेच मतदानात महिलांचा सहभाग या विषयावर नाटक व नृत्य स्पर्धा घेऊन महिला मतदारांमध्ये मतदानासंबंधी जनजागृती करण्यात आली.

राजकीय पक्ष मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. लोकशाहीसाठी अशा गोष्टी फारच घातक आहेत. या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या एका मताचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मतदार जनजागृती मोहिमेतून होत आहे.

०००००

 

निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत

चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर 13 – लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अंमलात आली आहे. या पार्श्वभुमीवर निवडणूक काळात रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तु जप्त करणे किंवा सोडणे यासाठी मानद कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.

या प्रक्रियेदरम्यान पोलिस विभागाकडे एफ. आय. आर.  किंवा तक्रार दाखल न करता कोषागारामध्ये रक्कम किंवा इतर मौल्यवान वस्तु ठेवल्याप्रकरणी संबंधित व्यक्तिंना होणारा त्रास कमी करणे, प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे, अशा प्रकारची कार्यवाही करतांना मानद कार्यपध्दतीचा काटेकोर अवलंब करणे, अन्य बाबींची छाननी / पडताळणी करणे इत्यादी कामांसाठी जिल्हास्तरावर जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे.

सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असून जिल्हा कोषागार अधिकारी हे सदस्य आहेत. तर निवडणूक खर्च परिक्षण व व्यवस्थापन पथकाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.  जप्त करण्यात आलेली रोख रक्कम सोडणे / सुपूर्द करणे बाबत निवडणूक खर्च परिक्षण व व्यवस्थापन पथकाचे नोडल अधिकारी यांनी निर्देशांचे तंतोतंत पालन करून अभिलेखाचे जतन करावे. समितीमध्ये असलेले अधिकारी व कर्मचारी हे संपूर्ण निवडणूक काळामध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 13 सी.सी. व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 28 ए अन्वये भारत निवडणूक आयोगाच्या नियंत्रण, अधिक्षण व शिस्त यांच्या अधीन असतील, याबाबत गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आदेशात नमुद आहे.

००००००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here