मुंबई, दि.14 : राज्यात रोजगार हमी योंजनेंअंतर्गत सुरु असलेल्या कामामध्ये शेतमजुरांचा सहभाग अधिक वाढावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे तसेच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक सोमवारी 02.00 ते 05.00 यावेळेत रोहयोच्या कामासंदर्भात आणि शेतमजुरांच्या अडचणीसंदर्भात बैठक घेऊन तक्रारीचे निवारण करावे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
विधानभवनात राज्यातील शेतमजर महिलांच्या रोजगारासंदर्भात असलेल्या अडचणी याबाबत बैठक आयोजित करण्यात आली.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सुमारे 900 शेतमजूर महिलांना रोजगाराची आवश्यकता असून त्यासंदर्भात वारंवार मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन हे काम तातडीने सुरु करावे. शेतमजूर महिलांचे मजुरीचे पैसे वेळेत देण्यात यावे. ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार निर्मितीसाठी जिल्हा-तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती देऊन यांत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील अविकसित जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु असलेली कामे, भविष्यात सुरु करण्यात येणारी कामे, लागणाऱ्या मजुरांची संख्या याची सविस्तर माहिती दर महिन्याला जिल्हानिहाय तयार करण्यात यावी, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिले.
रोजगार हमी परिषदेची बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती करून घेण्यात येईल. या बैठकीत रोजगार हमी परिषदेची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
रोहयो मंत्री संदीपान भुमरे म्हणाले, राज्यातील रोहयो अंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देऊन त्याची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांच्या अडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी आणि सामाजिक संस्था यांची जिल्हानिहाय आढावा बैठका घेण्यात येतील.
बैठकीत पडीक जमिनीवरील रोहयोची कामे, कोकणात शेततळे मंजुरी, शेतातील बांधाचा अंतर्भाव, वन जमिनी, ‘पेसा’ मध्ये रोहयोची कामे, खारपट्ट्यांमधील रस्त्यांची कामे यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. कोकण विभागामध्ये मजुरांची मागणी असलेल्या भागात तातडीने कामे सुरु करावीत, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.
यावेळी माजी आमदार शशीकांत खेडेकर, रोहयो विभागाचे सचिव, एकनाथ डवले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.