उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तरतुदींचे पालन करावे

नाशिक, दि. ४ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल  ते 3 मे 2024 या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना आवश्यक तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी  कळविले आहे.

निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 ही वेळ निर्धारित करण्यात आली असून या निर्धारित वेळेतच नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे.

इच्छुक उमेदवार व समर्थकांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येणार आहेत. यासाठी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी  शंभर मीटर परिसराची निश्चिती ( मार्कींग ) आधीच केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवार आणि त्यांच्या समवेत चार व्यक्ती अशा एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात एकाच दाराने प्रवेश देण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिस विभागाकडून सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून पोलिस नोडल अधिकारी या ठिकाणी आवश्यक पोलिस बंदोबस्तासह उपस्थित राहतील.

नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांनी या सर्व बाबींची नोंद घ्यावी. नामनिर्देशन पत्र आयोगाकडून निर्धारित वेळेतच दाखल करावयाचे असून नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी भारत निवड़णूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

०००