मंत्रालयीन अधिकारी – कर्मचारी यांना ‘कायझेन’चे प्रशिक्षण

मुंबई, दि. ५ ; कायझेन म्हणजे वैयक्तिक जीवनात आणि कार्यस्थळी चांगल्या प्रक्रियेसाठी सातत्याने सुधारणा करून लहान खर्चात मोठा बदल घडू शकतो. असे सांगून ही प्रक्रिया  निरंतर अंमलात आणल्यास  वेळ, कष्टाची बचत होऊन उत्साह निर्माण होत असल्याचे प्रतिपादन अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले.

मंत्रालयात अधिकारी – कर्मचारी यांना कायझेन इन्स्टिट्यूट मार्फत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

मध्यवर्ती टपाल केंद्र (C.R.U.) येथील टपालाचे व्यवस्थापन, ई ऑफिसच्या वापरास प्रोत्साहन देणे व जुन्या नस्त्यांचा अनुशेष निकाली काढणे यासाठी क्यूसीआय (QCI) मार्फत कायझेन इन्स्टिट्यूट (Kaizen Institute) या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी प्रशिक्षक हेमंत भांगे यांनी दिलखुलास संवाद साधत प्रशिक्षण दिले. यावेळी ते म्हणाले की, सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला असून सर्वांनी आपल्या वैयक्तिक जीवनात याचा उपयोग करावा. यामुळे  मोठा बदल नक्की घडून येईल असे त्यांनी सांगितले.

००००