निवडणुकीसह दुष्काळ निवारणाचीही कामे करा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे

बीड, दि. ६ (जिमाका):  निवडणुकीसह दुष्काळ निवारणाचे कामेही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी माजलगाव येथील आढावा बैठकीत अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना दिले.

39 बीड मतदार संघातील 229 माजलगाव विधानसभा मतदार संघाची पाहणी आज त्यांनी केली.  यावेळी त्यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरव इंगोले, तहसीलदार वर्षा मनाळे तसेच सर्वच विभागातील कार्यालयीन प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाणीटंचाईची समस्या असून योग्य व्यवस्थापन केल्यावर पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना कमी पोहोचतील अशी व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. माजलगाव धरणाला भेट देऊन इथली प्रत्यक्ष परिस्थिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे योग्य नियोजन करावे आणि मागेल त्याला काम मिळेल असे व्यवस्थापन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजलगाव विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंगरूम मुलींचे शासकीय वसतिगृह येथे तयार करण्यात आली असून त्याची पाहणी करून सुरक्षात्मक उपायांची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. माजलगाव तहसील कार्यालयात निवडणुकीसंदर्भात वेगवेगळे कक्ष स्थापन झाले असून या कक्षांना यावेळी त्यांनी भेटी दिल्या तसेच निवडणूक साहित्याची तपासणीही केली.

 

39 – बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजलगाव येथील सादोळा रोड केसापुरी कॅम्प येथील निगराणी पथकाची  (SST) पाहणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली.

०००