समाजमाध्यमांवरील उथळ मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज –  प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

0
7

नागपूर, दि. ८: भारतीय संस्कृतीचा विचार एका भक्कम पायावर उभा आहे. आजच्या माहिती युगात विविध ॲप्स व संकेतस्थळाशी निगडीत समाजमाध्यमांवरील वेगवेगळ्या मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित कारवा या तीन दिवसीय उत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी.एम. पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘बाईटसची लढाई : माहिती युद्धात भारताची भूमिका’  या विषयावर त्यांनी ओघवत्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्रधान सचिव श्री. सिंह म्हणाले की, माहितीच्या जालात प्रत्येक माहिती ही खरी असेलच हे सांगता येत नाही. अनेक चांगल्या गोष्टींबद्दल समाजमाध्यमांवर गैरसमज पसरविले जातात. क्युआर कोडच्या माध्यमातून आर्थिक व्यवहाराची किमया भारताने करुन दाखवली जी अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशाला शक्य झाली नाही. भारताने मोठ्या लोकसंख्येचा देशात ‘आधार’सारखी विश्वासार्ह व पूर्ण सुरक्षित प्रणाली निर्माण केली आहे.

लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहे. परंतु, अभिव्यक्तीच्या नावाखाली जर मतमतांतरे चुकीच्या माहितीवर आधारित असतील किंवा ती जाणीवपूर्वक कुणाची फसवणूक करणारी असतील तर त्याला कायद्याच्या चौकटीत अटकाव असण्याची गरज आहे. आपल्या शेजारील देशांमध्ये व इतरही देशांमध्ये समाजमाध्यमांवर उथळ व्यक्त होण्यावर शिस्तीचा बडगा उगारतात. तेथील कायदे याबाबतीत खूप कडक आहेत. जपान, जर्मन, फ्रान्ससारख्या देशात तेथील नागरिक अभिमानाने आपली मातृभाषा जवळ करतात. त्या भाषेला प्राधान्य देतात. गोपनीयतेचा सन्मान करतात. भारतातही आपण समाजमाध्यमांवर अभिव्यक्त होताना कायद्याला अभिप्रेत असलेली इतरांप्रतीची सभ्यता बाळगली जाणे आवश्यक आहे, असे श्री. सिंह यांनी नमूद केले.

आज भारतातील एक मोठा घटक समाजमाध्यमांशी जुळलेला आहे. यात चुकीची माहिती पसरविणारा सिंथेटिक मीडिया त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. युद्धाच्या काळात जाणीवपूर्वक चुकीच्या संदेशाचा रणनीतीसारखा केला जाणारा वापर आपल्याला नवा नाही. यापेक्षा परस्परांची विश्वासार्हता सत्याच्या आधारे वाढविणे याबद्दल सर्वांनी जागरूक असले पाहिजे.  पारंपरिक मुल्यातून समृद्ध झालेली ‘वसुधैव कुटुंबकम’ ही शिकवण आपण सर्वांनी जपली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here