लोकसभा निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

0
11

नाशिक, दि. ९ (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नाशिक जिल्ह्यातील 20-दिंडोरी आणि 21-नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी  दि. 26 एप्रिल ते 3 मे या कालावधीत नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येणार आहे. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्च करण्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस आधी नवीन स्वतंत्र बॅंक खाते उघडून घेणे आवश्यक आहे. उमेदवारास बॅंक खाते कोणत्याही बॅंकेत ( सहकारी बॅंकेसह ) किंवा पोस्टात उघडता येईल. उमेदवाराने त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीच्या नावे किंवा अन्य व्यक्तीच्या नावे खाते उघडू नये. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी उमेदवारांनी दिलेल्या निर्देशानुसार नवीन बॅंक खात्याचा क्रमांक व तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात कळवावा. उमेदवाराने निवडणुकीसाठी खर्च करावयाचा पैसा याच खात्यात जमा करावा आणि निवडणुकीसाठी येणारा सर्व खर्च याच बॅंक खात्यातून करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चासाठीचे  बॅंक खाते उमेदवाराने स्वत:च्या नावे किंवा उमेदवार आणि त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांचे संयुक्त खाते उघडावे. उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेसाठी नवीन बॅंक खाते उघडावे, यापुर्वीचे खाते निवडणूक खर्चासाठी उपयोगात आणू नये.

नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी उमेदवारांनी उपरोक्त निर्देशानुसार उघडलेल्या नवीन बॅंक उघडल्याबाबत त्या खात्याचा क्रमांक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिला नाही तर निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित उमेदवारास लेखी स्वरूपात नवीन बॅंक खात्याचा तपशील सादर करण्याबाबत कळवतील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांनी या सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी  आयोगाच्या या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here