अमरावती, दि. १० (जिमाका): निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, त्यासाठी प्रशासनामार्फत निवडणूक प्रशिक्षण देण्यात येत आहे. संबंधितांनी या प्रशिक्षणामार्फत आवश्यक सर्व माहिती अवगत करुन निवडणूक प्रक्रिया चोखपणे पार पाडावी, असे आवाहन मुख्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथान तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे मुख्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथान तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणूकविषयक कामकाजाबाबत नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी धारणी रिचर्ड यान्थन, अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
घरबसल्या मतदान हे प्रत्यक्ष 12 एप्रिलपासून सुरु होणार आहे. 85 वर्षावरील मतदार व दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान जागृती सोबतच नोटा याबाबतही नागरिकांना माहिती देणे गरजेचे आहे. ज्या मतदान केंद्रावरील मतदानाचे प्रमाण कमी आहे, त्या भगामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती करावी. मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था असावी. दिव्यांगांसाठी या मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता पाणी तसेच प्राथमिक उपचाराची व्यवस्था सर्व केंद्रांवर असावी. निवडणूक कामानिमित्त कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी निवडणूकीच्या कामांना प्राधान्य देत असतात. अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. सर्वांनी आपले प्रशिक्षण व्यवस्थितरित्या पूर्ण करुन निर्धारित जबाबदाऱ्या सक्षमतेने पार पाडाव्यात. प्रत्येकाने उत्कृष्ट ‘टीम प्लेअर’ म्हणून आपली भूमिका सक्षमतेने निभवावी, अशा सूचना नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांना यावेळी देण्यात आल्या.
०००