मुंबई, दि. १२: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त रविवार, दि. १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित एका माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी 133 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सकाळी 11 वाजता ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी 1 वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे.
‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, या माहितीपटाचे एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण एक्स या समाजमाध्यमावर होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..
‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट 17 मिनिटे कालावधीचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै 1968 मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.
या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे, तर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे, तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी…
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा.
या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी, तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.