प्रशासनाची सज्जता; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया दि.१८ पासून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान ही सर्व प्रक्रिया नामनिर्देशनाने सुरु होणार असून त्यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता केली असून सर्व पूर्वतयारीचा अंतिम आढावा आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज घेतला.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी स्वामी यांच्या सह उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरातील सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने बदल करावयाचे वाहतुक मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्याबाबतचे मार्ग, वाहनांचे पार्किंग, उमेदवारी अर्ज दाखल करावयास येणाऱ्या उमेदवारांसाठी असणारे नियम इ. बाबत सुरक्षा यंत्रणांकडून आढावा घेण्यात आला. येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, आवश्यकतेनुसार दिशादर्शक फलक इ. तयारीचा आढावा घेण्यात आला. नामनिर्देशन दाखल करणे, त्यांची छाननी, उमेदवारी अर्ज माघारी घेणे अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर आवश्यक असणारा पोलिस बंदोबस्त व आयोगाच्या सुरक्षा निर्देशांची तपासणी करण्यात आली.

वाहतुक मार्गात बदल

१९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया गुरुवार दि.१८ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने दि.१८ (उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिनांकापासून) ते दि.२९ पर्यंत (उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिनांकापर्यंत) वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय परिसरातील वाहतुक वळविण्यात आली आहे. दि.१८ ते दि.२९  दरम्यान दररोज सकाळी ९ ते सायं.६ दरम्यान या परिसरातील वाहतुक सर्व वाहनांसाठी बंद करुन अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

बंद वाहतुक मार्ग

चांदणे चौक- जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानाजवळील टी- पॉईंट पर्यंत.

पर्यायी मार्ग– 

  • चांदणे चौक- अण्णाभाऊ साठे च्चौक- उद्धवराव पाटील चौक- सत्यविष्णू हॉस्पिटल चौक- एन १२ गणपती विसर्जन विहीर मार्गे येतील व जातील.
  • चांदणे चौक- फाजलपुरा- चेलीपुरा चौक- चंपा चौक- विभागीय आयुक्त निवासस्थानासमोरील दर्गा मार्गे येतील व जातील.

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावशयक सेवेच्या वाहनांना हा वाहतुक बदल लागू असणार नाही असे शहर वाहतुक शाखा -१ चे पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांनी कळविले आहे.

०००