स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने पोलिसांच्या मदतीने काटेकोरपणे वाहन तपासणी करावी – मुंबई शहर जिल्ह्याचे आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांचे निर्देश

0
25

मुंबई, दि. 24 : स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने (SST) वाहन तपासणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, वाहनतपासणी दरम्यान रोख रक्कम, मद्यसाठा, भेटवस्तू व शस्त्रसाठा पोलिसांच्या मदतीने तपासावा. संपूर्ण तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घ्यावी. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामकाजावर निरीक्षक (खर्च) देखरेख ठेवणार आहे. तसेच वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमने सतर्क राहून त्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल विहित वेळेत संबंधितांना पाठवावा, असे निर्देश मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांनी दिले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज आयोजित या प्रशिक्षण शिबिरात श्री. महाजन यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरास उपजिल्हाधिकारी तथा तक्रारी व्यवस्थापन निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे समन्वय अधिकारी राजू थोटे, अतिरिक्त जिल्हा माहिती-तंत्रज्ञान अधिकारी विद्याधर शेळके आदी उपस्थित होते. या शिबिराला `३०-मुंबई दक्षिण मध्य` व `३१-मुंबई दक्षिण` लोकसभा मतदारसंघातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीममधील (SST) नियुक्त अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशासनाने स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त केल्या आहेत. २६ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे दाखल होणार असून या पार्श्वभूमीवर सदर टीमचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिरात भारत निवडणूक आयोगाने Election Seizure Management System (ESMS) हे विकसित केलेले ॲप कसे हाताळावे, याबाबत श्री. महाजन यांनी सविस्तर माहिती दिली.

लोकसभा निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात व्हाव्यात, यासाठी या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमची (SST) नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांनी तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

****

शैलजा पाटील/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here