शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना

१८ लाख ३६ हजार ०७८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अमरावती, दि. २५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.

जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री. शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. अमरावती मतदारसंघाकरिता ईव्हीएम गोडावून न.1 (लोकशाही भवन) विद्यापीठ रोड येथून वितरण झाले. तिवसा मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर, सातरगाव रोड तिवसा, दर्यापूर मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर,दर्यापूर, मेळघाट मतदारसंघाकरिता फातिमा कान्वेंट हायस्कुल हॉल तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम्, कोर्ट रोड या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात 354 सर्वाधिक मतदान केंद्र मेळघाटात असून सर्वात कमी 309 मतदारसंघात अचलपूर येथील आहे. बडनेरा मतदारसघांत 337 मतदानकेंद्र, अमरावती मतदारसंघात 322, तिवसा मतदारसंघात 319, दर्यापूर मतदारसंघात 342 याप्रमाणे एकूण 1 हजार 983 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र (पिंक बुथ), एक दिव्यांग मतदान केंद्र, युवा अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. तसेच बडनेरा मतदारसंघातील मतदान केंद्र 257 – मनपा उर्दु प्राथमिक मुलांची शाळा क्र.10 खोली क्र.4 जुनी वस्ती बडनेरा हे इंद्रधनुष्य (Rainbow) या थीमवर असणार आहे. आणि धामणगाव रेल्वे येथील जि.प.प्रायमरी मराठी शाळा खोली क्र.1 उसळगव्हाण हे मतदान केंद्र आदिवासी मतदान केंद्र या थीमवर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहेत. जिल्ह्यातील 993 मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व  सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.

०००