२९-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती

मुंबई, दि. 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुरजकुमार गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांचे  कार्यालय हे  29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई 400051 येथे असून त्यांचा संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक +91 8591369100 असा आहे.

आज निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांनी या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, वॉर्ड ऑफीसर, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यासह मतदारसंघासाठी नियुक्त केलेली खर्च सनियंत्रण समिती, आयकर विभागाचे नोडल अधिकारी आणि निवडणुकीसाठी नियुक्त विविध अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी खर्च विषयक अनुषंगाने निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी केलेल्या खर्चाकडे बारकाईने लक्ष द्यावे. प्रत्येक बाब ही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी त्यांच्या खर्चविषयक बाबींमध्ये नोंदविली गेली असल्याबाबत यासाठी नेमलेल्या विविध पथकांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न कऱण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी त्यांना मतदारसंघात यंत्रणेने केलेल्या तयारीची माहिती दिली.

0000