महिलांनी सक्रीयपणे मतदानात सहभाग नोंदवावा –जिल्हा निवडणूक अधिकारी

बीड.दि. (जिमाका): महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात  प्रगती साधली आहे. मतदारांमध्ये जनजागृतीचे कामही महिला उत्कृष्टपणे पार पाडत आहे. बीड लोकसभा मतदार संघातील निवडणुका सोमवार दिनांक 13 मे रोजी होणार आहेत. यामध्ये महिलांनी नि:संकोचपणे स्वविवेकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी केले आहे.

 

बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 55 महिला मतदान केंद्र असून मतदान केंद्राच्या ठिकाणी महिला अधिकारी कर्मचारी तैनात असतील.

महिलांचा मतदानात सक्रिय सहभाग असावा यासाठी स्तनदा माता, गरोदर महिला, लेकुरवाळ्या स्त्रियांसाठी मतदान केंद्रावर तात्पुरत्या अंगणवाड्या उभारण्यात येत आहेत. या  ठिकाणी पाळणा लहान मुलांसाठी, खेळणी असणार आहेत. स्तनपान कक्ष, गरोदर मातांसाठ आरामाची सुविधा आदींबाबत तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

प्रशासनातील महिला अधिकारी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्नरत

जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे या स्वतः दिवस-रात्र काम करून बीड लोकसभा मतदार संघातील मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात सर्वच अधिकारी कर्मचारी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तयारीत आहेत.

यासह बीड विधानसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी कविता जाधव यादेखील अधिकाधिक मतदान विधानसभा मतदारसंघात व्हावे, यासाठी तयारीला लागल्या आहेत.

कायदा सुव्यवस्था नीट राहावी, याकरीता आंबेजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके या सज्ज आहेत.

महिलांनी मतदानाच्या दिवशी सक्रिय राहावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील यादेखील प्रयत्न करत आहेत.

माजलगाव तालुक्याच्या तहसीलदार वर्षा मनाळे, तहसील मध्ये निवडणुकीची प्रक्रिया नीट व्हावी यासाठी कार्यरत आहेत.

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या सदस्य सचिव तथा मीडिया कक्षाच्या प्रमुख अंजू निमसरकर काम पाहत आहेत. यासह तहसीलदार तेजस्विनी जाधव आणि सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वसुधा रघाताटे या ही निवडणुकीच्या जबाबदाऱ्या कर्तव्यपूर्णरित्या पार पडत आहेत. याशिवाय विविध विभागातील निवडणुकीची प्रक्रिया पार पडणाऱ्या अधिनस्ताच्या आदेशाचे काटेकोरपणे महिला कर्मचारी पालन करीतआहेत.

या सर्व महिला अधिकाऱ्यांनी व महिला कर्मचाऱ्यांनी आवाहन, केले आहे बीड लोकसभा मतदारसंघातील महिलांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा.

०००