भारतीय पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत
रायगड जिमाका दि.6- भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधीचे मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरिता रायगड जिल्ह्यातील 32 रायगड लोकसभा मतदार संघात आगमन झाले आहे. या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्षाची पाहणी केली.
भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था (EMBs) यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी International Election Visitors Programme (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे.
या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीय संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत करण्यात आले. या विदेशी प्रतिनिधी मंडळ मध्ये बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी , जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे आहेत.
या प्रतिनिधींनी जी.एस.एम. महाविद्यालयात सुरु असलेल्या मतदान केंद्रस्तरीय पथकाचे साहित्य वाटपाची पाहणी केली. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जाण्यासाठी केलेल्या वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. याबरोबरच मतदान यंत्राविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना एकूण मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ ज्योस्ना पडियार यांनी ई व्ही एम, व्ही व्ही पॅट याविषयी प्रत्यक्ष हाताळणी करून दाखविले. या मंडळाने नेहूली येथील स्ट्रॉंगरूम ची पाहणी केली. मतदानानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची विधानसभा मतदार संघनिहाय रचना केली जाते. त्याची पाहणी केली. त्याविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच मतमोजणी कशा पद्धतीने होते, मतमोजणी केंद्राची रचना, आवश्यक त्या सर्व बाबींची माहिती घेतली.
०००