मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

0
8

मुंबई उपनगर, दि. 7 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या चारही मतदारसंघातून एकूण 87 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी तेजस समेळ (निवडणूक) उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख मतदार

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबई उत्तर मतदारसंघात 19, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात 21, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 20, तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी सुरू केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 40 लाख 2 हजार 749, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 44 हजार 819 एवढी आहे. मतदानासाठी सात हजार 384 मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी दोन हजार 32 मतदान केंद्रांची संख्या तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. अशा मतदान केंद्रांवर उन्हाळा, अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन केले आहे. तेथे वॉटरप्रुफ मंडप टाकण्यात येतील. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, रॅम्पची व्यवस्था असेल. मतदान केंद्रे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. या मतदान केंद्रांवर आवश्यक 40 हजार 615 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

दोन हजार 728 मतदार करणार गृह मतदान

या चारही मतदारसंघात 16 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने अतिरिक्त बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांत ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास अनुसरून दोन हजार 728 मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी 200 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके 10 व 11 मे 2024 या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडतील. तसेच दिव्यांग व 85 वर्षांवरील मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र ते मुख्य मार्गावर बेस्टच्या बसची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यक तेथे ऑटो रिक्षांची मदत घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी बूथ लेव्हल मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचार तातडीने मिळतील, असे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मदतीने मतदान केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेनंतर मुंबई उपनगर जिल्ह्यास अधिकची पोलीस कुमक मिळणार आहे.  निवडणूक कामासाठी नियुक्त आणि अत्यावश्यक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी निवडणूक कर्तव्यावरील 16 हजार 596, तर अत्यावश्यक सेवेच्या कर्तव्यावरील सहा हजार 917 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्यासाठी मतदार सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात येतील.

 मुंबई उपनगर जिल्ह्यात 12 निवडणूक निरीक्षक दाखल

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण चार, खर्च तपासणीसाठी सहा, तर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दोन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. केंद्रीय यंत्रणा व राज्य यंत्रणेकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी 148 बैठी पथके तर 134 फिरती पथके अशी एकूण 282 पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत विना परवाना, अवैध वाहतूक या प्रकारात 99 लाख 65 हजार रुपये किमतीची 56 हजार 386 लिटर दारू ताब्यात घेतली आहे, तर 17 कोटी 93 लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

मतमोजणीची तयारी सुरू

मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघासाठी मतमोजणी नेस्को, गोरेगाव येथे तर मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघासाठीची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होणार आहे. त्याचीही तयारी सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

00000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here