राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक नाही; प्रभावी उपाययोजनांसाठी साथरोग प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी

महानगरातील मॉल, हॉटेल सुरु राहणार;चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 13 : साथरोग प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांसाठी आवश्यक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा देखील सुरु राहतील. तसेच महानगरांमधील मॉल्स आणि हॉटेल सुरु राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.

दरम्यान, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा लागू झाला म्हणजे राज्यभरात साथरोगाचा उद्रेक झाला असा अर्थ होत नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रतिबंधात्मक उपायांसाठी राज्य शासन अशाप्रकारे कायदा लागू करुन आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे त्या माध्यमातून अंमलात आणू शकते. यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता आवश्यक ती खबरदारी बाळगावी. सामूहिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करणे टाळावे. मॉल्स, हॉटेल सुरु असले तरी तेथे जाणे टाळल्यास अनावश्यक गर्दी होणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यामध्ये सध्या 133 संशयित रुग्ण भरती झाले असून 13 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 हजार 390 विमानांमधील 1 लाख 60 हजार 175 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. 18 जानेवारीपासून राज्यात सध्या वेगवेगळ्या विलगीकरण कक्षामध्ये एकूण 532 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 441 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहे. त्यातील 17 जण पॉझिटिव्ह आहेत. सध्या पुणे येथे 18 जण, मुंबई येथे 35, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 18 जण, यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9 जण तर पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात 3 संशयित रुग्ण  भरती करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत बाधित भागातून 818 प्रवासी आले आहेत.

००००

अजय जाधव/विसंअ/13.3.2020