छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका): लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविले. त्यात लक्षणीय आणि अभिनव उपक्रम ठरला तो मतदान केंद्रांवर पाळणाघरे स्थापित करण्याचा. हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. अनेक मातांनी आपलं कडेवरचं बाळ पाळणाघरात सांभाळायला देऊन आपले लोकशाहीप्रति कर्तव्य बजावले.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’, ही मातेची महती. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मातांनी आपली बालके प्रशासनाने उभारलेल्या पाळणाघरात सोपवून आपला मतदानाचा हक्क बजावला, आणि ही मतदार माऊली लोकशाहीची उद्धारकर्ती झाली.
महिला मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. त्यात हा उपक्रम सर्वात उपयुक्त आणि लक्षणीय ठरला. मतदान केंद्रांवर पाळणाघरे स्थापित करण्याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला निर्देश दिले. त्यानुसार महिला बालकल्याण विभागामार्फत कार्यवाही करुन अंमलबजावणी करण्यात आली. एखादी माता मतदानासाठी आली असता तितकावेळ तिच्या कडेवरील बाळाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ होणे अपेक्षित आहे. किंवा मतदार लहान मुलासह मतदानाला आल्यास त्या मतदाराला मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ त्या बाळाला सांभाळण्यासाठी पाळणा घर सुविधा देण्यामागचा विचार होता.
प्रत्येक पाळणाघर एका अंगणवाडी ताईंकडे सोपविण्यात आले. या ठिकाणी येणाऱ्या बालकाला तिथं अनेक खेळणी, झोपाळ्यात असलेल्या बालकांसाठी प्रत्यक्ष पाळणे, प्यायचे पाणी, बेबी फुड आदींची सज्जता होती. जिल्ह्यात शहरी भागात १८० तर ग्रामिण भागात १६५० पाळणाघरे सज्ज होते. ज्या इमारतीत अनेक मतदान केंद्र असतील तेथे त्या इमारतीत एक पाळणा घर याप्रमाणे नियोजन होते. पाळणाघराचा लाभ हा स्तनदा माता, लहान बालके असणाऱ्या मातांना खूप झाला. त्यांनी आपली बालके पाळणाघरात सोपविली. तेथली खेळणी व आकर्षकता पाहून बालकेही तिथे रमली. बागडली. त्यांच्या किलबिलाटाने पाळणाघर गजबजले. लोकशाहीसाठी आपले मतदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या मातांना ही एक चांगली सुविधा होती. त्यामुळे महिलांचा मतदानातील सहभाग होतांना दिसत होता.
०००