मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचेल मतदार चिठ्ठी

0
9

मुंबई दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट 27- मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. 19 मे 2024 पूर्वी सर्व मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांनी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 20 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे. 27- मुंबई उत्तर- पश्चिम मतदारसंघात विधानसभेचे 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, 164- वर्सोवा, 165- अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘स्वीप’ समितीच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबरोबरच प्रत्येक मतदाराला त्याचे मतदार यादीतील भाग, अनुक्रमांक, मतदान केंद्राचे नाव आणि ठिकाण याविषयीची माहिती व्हावी म्हणून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी (Voter Slips) पोहोचविण्यात येत आहेत.

विधानसभेच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात 1 लाख 8 हजार 201, दिंडोशी मतदारसंघात 1 लाख 93 हजार 796, गोरेगाव मतदारसंघात 1 लाख 24 हजार 277, अंधेरी पश्चिम मतदारसंघात 1 लाख 37 हजार 227 त्याबरोबरच अंधेरी पूर्व, वर्सोवा मतदारसंघात जवळपास प्रत्येक मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच मतदानापूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचलेली असेल. तसेच मतदानाच्या दिवशी बीएलओ मतदारांच्या सहकार्यासाठी मतदान केंद्रांजवळ थांबतील. ते तेथे मतदारांना मार्गदर्शन करतील, असेही श्रीमती सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here