ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे दिव्यांग मतदारांना घरोघरी वाटप

0
9

ठाणे,‍ दि. १४ (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत सर्वच घटकातील नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 148 विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती  चिठ्ठीचे वाटप प्रत्यक्ष दिव्यांग मतदारांच्या निवासस्थानी जावून करण्यात आले.

२५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेल लिपीमध्ये मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या अंतर्गत ठाणे शहरातील जास्तीत जास्त अंध मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यात सुलभता व्हावी, यासाठी ब्रेल लिपीमध्ये माहिती दस्तऐवज तसेच चिठ्ठी दिव्यांग मतदारांना देण्यात आली.

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करता यावे यासाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी मतदारांना देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन दिव्यांग मतदारांना करण्यात आले.

दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी  मतदारांना प्रत्यक्ष घरी उपलब्ध करुन दिल्याबद्दल  सर्व दिव्यांग मतदारांनी भारतीय निवडणूक प्रशासनाचे आभार मानले आहेत.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here