महिला, युवा, दिव्यांग नाविन्यपूर्ण मतदान केंद्र – जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि.१९ (जिमाका) :  २० मे २०२४ रोजी होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मेहनत घेत असून महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद्र एकसारखी असावीत यासाठी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकी १ या प्रमाणे १८ केंद्रे सखी मतदान केंद्रे, 18 युवा मतदान केंद्रे, 17 दिव्यांग केंद्रे व काही मतदान केंद्रे हे आगरी –कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारी करण्यात येणार आहे.

महिला मतदान केंद्रावर संपूर्ण पथक हे महिलांचे असणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, शिपाई म्हणून महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी थीम गुलाबी रंग ठरविण्यात आली आहे. यामध्ये महिला मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व महिला कर्मचारी यांनी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील विविध क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या महिलांचे फोटो लावण्यात येणार आहेत.

युवा मतदान केंद्रावर सर्व युवा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी पिवळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुध, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी पिवळया रंगाचे वस्त्र (टिशर्ट/शर्ट) परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या युवा यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्रज्ञ, अभिनेता यांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये १७ मतदान केंद्रांवर दिव्यांग कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या केंद्रासाठी फिकट निळा/आकाशी रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी फिक्कट निळा/आकाशी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या दिव्यांग यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्र, अभिनेता, लेखक यांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत.

भिवंडी ग्रामिण मतदार संघामधील सारंग या गावातील मतदान केंद्र क्र.३२१ हे विशेष (युनिक) मतदान केंद्र असणार आहे. हे मतदान केंद्र ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी संस्कृतीने सजविण्यात येणार आहे. यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, मासे विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या, बोट, रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी हे पारंपारीक कोळी वेशभुषेत असतील.

दिनांक २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना केले आहे.

०००