माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

0
22

मुंबई, दि. २९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतर्वासिता (इंटर्नशिप) करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इच्छुकांना दि. १५ जून २०२४ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहे.

महासंचालनालयाद्वारे शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना मुद्रित, दृकश्राव्य, वेब, समाज माध्यम अशा विविध माध्यमांतून प्रसिद्धी दिली जाते. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे.

आंतर्वासिता कालावधी 3 महिन्यांचा असेल. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही. विद्यार्थ्यांच्या पात्रता/कौशल्यानुसार त्यांना मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी विविध शाखांमध्ये काम दिले जाईल. कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी असेल तथापि, संबंधित शाखांच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेतला जाईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणला जाईल. यशस्वीरित्या आंतरवासिता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

इथे करा अर्ज

इच्छुकांनी संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहिती, नमुन्यातील माहिती, पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी. पाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ आहे. अर्जाच्या नमुन्यासाठी महसंचालनालयाच्या महासंवाद या पोर्टलवर पुढील लिंकवर http://13.200.45.248/?p=127837  जाहिरात पहावी.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here