मुंबई, दि.30 : राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवार, दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे, 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे.
शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयापेक्षा अधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दिनांक 06 जुलै, 2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयापेक्षा अधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 मे, 2024 ते दिनांक 7 जून, 2024 असा आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील उपरोक्त शुद्धीपत्रकाचे अवलोकन करावे, असे आयोगाकडून कळविण्यात येत आहे.
००००
राजू धोत्रे/विसंअ