जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडून शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी,आढावा

0
9

मुंबई दि. १ : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. ४ जून, २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी आज शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करून मतमोजणीसाठी आवश्यक उपाययोजना आणि सोयीसुविधांचा आढावा  घेतला.

यावेळी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे,पोलीस उपायुक्त संजय लाटकर, मुंबई राज्य वातावरणीय कृती कक्षाचे स्ट्राँग रूम संचालक तथा समन्वय अधिकारी अभिजीत घोरपडे,तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था,माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके, आपत्कालीन कंट्रोल रूमची पाहणी करून चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहील यादृष्टीने सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी दिल्या.

मतमोजणी केंद्राच्या परिसरातील स्वच्छता आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुरक्षा उपाययोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. मतमोजणी केंद्रातील नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष, चौकशी कक्ष आणि वैद्यकीय कक्ष  उपलब्ध  असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी यावेळी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत संबंधितांना सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here