शिवडी येथील मतमोजणी केंद्रावर पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध – जिल्हाधिकारी संजय यादव

0
7

मुंबई, दि. ३ : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. या मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

वैद्यकीय सुविधा

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात आवश्यक औषध साठ्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. तसेच पुरेसे ओआरएस (ORS) व ग्लुकोज (Glucose) पावडर याठिकाणी उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी ४ ॲम्बुलन्सची व्यवस्था असून त्यापैकी एक कार्डियक ॲम्बुलन्स असणार आहे. वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये १० बेड आरक्षित करण्यात आले आहेत. वैद्यकीय मदत वेळेवर मिळण्यासाठी स्वतंत्र वेल्फेअर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मदत कक्ष

मतमोजणी केंद्रावर नियुक्त मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष तर राजकीय प्रतिनिधींसाठी चौकशी कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.

पिण्याच्या पाण्याची सुविधा

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षाच्या ठिकाणी तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल टॉयलेट व्हॅनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी मतमोजणीच्या दिवशी स्वच्छता कर्मचारी याठिकाणी उपस्थित असणार आहेत.

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी भोजन व नाश्त्याची व्यवस्था असणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दलाच्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्षात इंटरनेट सुविधा, माध्यम प्रतिनिधींसाठी भोजन व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रातील सर्व कक्ष हे वातानुकूलित करण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रावर उष्णता व पावसाची शक्यता या दोन्ही दृष्ट‍िने खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर नियमित, सुरळीत विद्युत पुरवठा राहावा यासाठी आवश्यकता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरात विषारी सापांचा वावर असल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती म्हणून सर्पमित्रांची नेमणूक करण्यात आली आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here