ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची रंगीत तालीम

0
14

ठाणे, दि. ३ ( जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी उद्या, 4 जून 2024 रोजी होणार आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे होणार असून सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून आज या संपूर्ण प्रक्रियेची रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली असल्याची ‍ माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी  दिली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या रंगीत तालीम दरम्यान 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकारी सुनिल भुताळे, 146 ओवळा  माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव मस्केपाटील, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील, 150 ऐरोली मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी अडकुणे, तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण एक हजार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर एकूण 650 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 या प्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2 मतमोजणी सहाय्यक व 1 सूक्ष्म निरीक्षक (Microbserver)असणार आहेत. तर प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी सुपरवायझर,1 पर्यवेक्षक व 1 मतमोजणी सहायक, 1 शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँगरुममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाली मतपत्रिकेच्या मोजणीसाठी देखील स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पासधारक माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र माध्यम कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज झालेल्या रंगीत तालीम दरम्यान मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रियेची सर्व माहिती देण्यात आली. तसेच मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, सोयीसुविधा याचा आढावा  निवडणूक निर्णय अधिकारी  मनिषा जायभाये-धुळे यांनी घेतला.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here