भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची रंगीत तालीम

ठाणे, दि. ३ जिमाका : 23-भिवंडी  लोकसभा मतदार संघातील मतमोजणी के.यू. डी.  कंपाउंड, कल्याण सापे पडघा रोड, सावद गाव, पो. आमणे, ता.भिवंडी  येथे होणार असून मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार असून आज मतमोजणी केंद्रात केंद्रीय निवडणूक निरीक्षक राजनवीर सिंग कपूर, राजेशकुमार साह व निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम पार पडली.

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच  विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 टेबल  तर मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 21 टेबल लावण्यात आले आहेत.  तर टपाली मतदान मतपत्रिका  मोजणीसाठी स्वतंत्र 14 टेबल लावण्यात आले आहेत.  टपाली मतपत्रिकेची मतमोजणी ही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार कोष्टी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्याअधिपत्याखाली त्यांच्या अधिपत्याखाली टपाली मतपत्रिकेचे मोजणी होणार आहे.

134 भिवंडी   ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी 25  फेऱ्या, 135 शहापूर विधानसभा मतदारसंघासाठी 24 फेऱ्या, 136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी 22 फेऱ्या, 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी 23 फेऱ्या, 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी  29 फेऱ्या, आणि 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी 25 फेऱ्या होणार आहेत.

प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक निरीक्षक,  एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई, केंद्रीय सूक्ष्म निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत, केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे दोन निरीक्षकांची नियुक्ती या मतमोजणीसाठी करण्यात आलेली आहे.. मतमोजणीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच सर्व सहाही  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील सर्व कर्मचारी असे  एकूण 550 अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 500 हून अधिक पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच पासधारक माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र माध्यम कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज झालेल्या रंगीत तालीम दरम्यान मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रियेची सर्व माहिती देण्यात आली. तसेच मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, सोयीसुविधा याचा आढावा  निवडणूक निर्णय अधिकारी  संजय जाधव यांनी घेतला.

०००