सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प राज्यासाठी आदर्शवत – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि. 7 (जिमाका):  महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाचा भरोसा- सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा प्रकल्प राज्यासाठी निश्चितपणे दिशादर्शक व आदर्शवत ठरेल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.
महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभाग राबवित असलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील मागील पाच वर्षातील महिलांबाबत घडणा-या गुन्ह्याचा तपशील पाहता यामध्ये बलात्कार 248, पोक्सो अंतर्गत गुन्हे 964, कौटुंबिक हिंसाचार 869, लैगिंक अत्याचाराचे 1 हजार 399 गुन्हे दाखल आहेत, त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षितेतकरीता सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये भरोसा केंद्राची उभारणी करुन पोक्सो, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, लैगिंक अत्याचार यामधील पिडीतांना सहाय्य व मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपत्कालीन परिस्थितीत पिडीतांना वेळेवर मदत देणे, पोलीस, वैद्यकीय, कायदेशीर मदत तसेच समुपदेशन हे एकाच छताखाली देण्याच्या दृष्टीने भरोसा केंद्र अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या केद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाला प्रक्षिक्षण द्यायला सुरूवात करा असे सांगून पिडीतांशी संवेदनशिलपणे वागणे, त्यांना अपमानास्पद, निष्ठुरपणे वागणूक यंत्रणेकडून मिळणार नाही याची दक्षता घेणे यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे यासंबंधी प्रशिक्षण घ्यावे, असे निर्देशही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्पांतर्गत करण्यात येत असणाऱ्या अन्य उपाययोजनांमध्ये पोलीस पेट्रोलिंगमध्ये गुलाबी स्कुटी पथकाचा समावेश, वाहतूकीच्या शेवटच्या माईलमोडमध्ये क्यूआर कोड आधारित लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग, राज्य परिवहन बसेसमध्ये आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये सीसीटीव्ही आणि डॅशकॅम चा वापर, महिलांना प्रशिक्षण देवून पिंक ईव्ही वाहनांचा वापर वाढविणे, महिलांसाठी 181 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करुन देणे आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी यावेळी सांगितले.
भरोसा केंद्र- महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात पोलीस विभागातर्फे करण्यात येत असणाऱ्या उपाययोजनांमध्ये भरोसा केंद्राची उभारणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. याद्वारे पिडीत महिलांना सुरक्षित वातावरण देणे आणि निपक्षपातीपणे न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे, वेळेवर आपत्कालीन मदत देणे, यादृष्टीने हे भरोसा केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प या उपक्रमांतर्गत मानसिक आरोग्य सेवा समुपदेशन, वैद्यकीय तपासणी, भरपाई संदर्भात कार्यवाही, दंडाधिकाऱ्यांकडून जबाब नोंदविणे, कायदेशीर मदत, तात्पुरता निवारा, अशा आपत्कालीन सेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच कल्याणकारी सेवांमध्ये स्वसरंक्षण वर्ग, पिडींतासाठी सामान्य जीवन पुनर्निमीतीसाठी मार्गदर्शन, किशोरवयीन गर्भधारणेबद्दल जागरुकता, व्यसनमुक्ती प्रशिक्षण आणि कौशल्य अभ्यासक्रम, लैगिंक शिक्षण, यासारख्या कल्याणकारी सेवाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
00000