विधानपरिषद प्रश्नोत्तरे

उपयुक्तता तपासून अभ्यासक्रमाचे रुपांतर करणार

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक

मुंबई,दि.13: शिक्षण सोडून  गरजेपोटी नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे या हेतूने राज्यात1988मध्ये बारावी व्यावसायिक (एच एस सी व्होकेशनल) अभ्यासक्रम सुरु करण्यात आला होते. काळानुरुप या अभ्यासक्रमाची उपयुक्तता तपासून या अभ्यासक्रमाचे रुपांतर करण्यासाठी समिती नेमून या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. मलिक म्हणाले,विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या राज्यातील +2स्तरावरील उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा मिळणारा कमी प्रतिसाद आणि या अभ्यासक्रमाची आजच्या काळात कमी होत चाललेली उपयुक्तता लक्षात घेता समितीच्या अहवालानंतर आवश्यकता वाटल्यास या अभ्यासक्रमास खंडित केले जाईल. मात्र या अभ्यासक्रमासाठी नियुक्त शिक्षक,लिपिक,भांडारपाल या शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवेचे संरक्षण देण्यात येईल,असेही ते म्हणाले.

या विषयी सदस्य सर्वश्री प्रा. अनिल सोले,डॉ. रणजीत पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील

गैरव्यवहाराची उपसचिवांमार्फत चौकशीउच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई,दि.13: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील  विविध इमारतींच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून येत्या तीस दिवसांच्या आत अहवाल मागवून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. सामंत म्हणाले,नॅकच्या अनुषंगाने केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी यापूर्वी गठित करण्यात आलेल्या समितीने कुलगुरुंच्या विरोधात16दोषारोप केले आहेत. मात्र तत्कालीन कुलगुरु हे निवृत्त झाले असल्याने विधि व न्याय विभागाचे अभिप्राय मागवून  कारवाई करण्यात येईल. आवश्यकता असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सदस्य विक्रम काळे,हेमंत टकले,ॲड. निरंजन डावखरे आदींनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

००००

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

– शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई,दि.13: राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत10-20-30असा लाभ देण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. कडू म्हणाले,सगळ्यांना हा लाभ लागू असून,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.1जानेवारी2016पासून लागू  करण्यात येऊन  पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी हा लाभ देण्यात येईल,असेही ते म्हणाले.

याविषयी सदस्य डॉ. सुधीर तांबे,डॉ. रणजीत पाटील,विक्रम काळे,कपिल पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सर्वंकष धोरण आणणार – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई,दि.13: राज्यातील शाळांमधील कला,क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या नेमणुकीसाठी सर्वंकष असे धोरण तयार करण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. कडू म्हणाले,खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती ही ‘पवित्र’ या प्रणालीमार्फत करण्यात येते. संच मान्यतेनुसार रिक्त पदांवर शैक्षणिक संस्थांच्या मागणीनुसार पदभरती करण्यात येतात. आतापर्यंत मागणी केलेल्या48क्रीडा शिक्षकांपैकी15शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

याविषयी सदस्य दत्तात्रय सावंत,नागो गाणार,श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००