मुंबई, दि. 12 : सातारा जिल्ह्यातील तारळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत तारळे, बांबवडे उपसा सिंचन योजनांमध्ये जुने सदोष यांत्रिक साहित्य बदलवून अद्ययावत पाणी उपसा करणारी यंत्रणा बसवावी. या उपसा सिंचन योजनेचे प्रात्यक्षिक घेऊन ही योजना 10 ऑगस्ट 2024 पूर्वी कार्यान्वित करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
मंत्रालयात तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजना, मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पातील नाटोशी उपसा सिंचन योजना व केरा मणदुरे विभागातील निवकणे, चिटेघर व बिबी प्रकल्पाबाबत बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता श्री. धुमाळ सहभागी झाले होते.
मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पांतर्गत नाटोशी उपसा सिंचन योजनेच्या कामाचा आढावा घेत मंत्री श्री. देसाई म्हणाले, या योजनेचे बंद पाईप लाईनचे काम सुरू करावे. ही योजना पूर्ण झाल्यास पाटण तालुक्यातील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तारळी पॅटर्नप्रमाणे केरा मणदुरे विभागातील निवकणे, चिटेघर व बिबी या प्रकल्पातील दोन्ही तीरावरील शेत जमिनीस उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घ्यावे. सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. निवकणे उपसा सिंचनाची उंची न वाढवता आहे त्याच स्थितीत कामे करण्यात यावीत, असे निर्देशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.
तराळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी महावितरणने या भागातील भारनियमन काही दिवसांसाठी रद्द करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी महावितरणला दिल्या. सर्व योजना पूर्ण क्षमतेने एकाच वेळी सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.
0000
निलेश तायडे/विसंअ/