मुंबई, दि. १२ :- मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्व संबंधित पदनिर्देशित अधिकारी व समन्वय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे तसेच या निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालनही काटेकोरपणे करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.
मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४- च्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पदनिर्देशित अधिकारी व समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतिष बागल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.
मतदान केंद्रे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश
श्री. क्षीरसागर म्हणाले, मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रे सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.
दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. वाहतूक आराखडे तयार करावे. निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी कालबद्ध वेळापत्रक तयार करण्याचे निर्देशही श्री. क्षीरसागर यांनी दिले.
१४ जून रोजीच्या प्रशिक्षणास सर्व संबंधितांची उपस्थिती बंधनकारक
मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण १४ जून रोजी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणास सर्व संबंधितांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
—–000——