‘लेक लाडकी’ योजनेला अधिक गती द्यावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

0
4

मुंबई, दि. १२ : मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु करण्यात आलेल्या लेक लाडकी  योजनेतून १८ हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला. ३८ हजार लाभार्थी प्रक्रियेत असून त्यांनाही लवकरच लाभ मिळेल. परंतू या योजनेची अधिक जनजागृती करून या योजनेला गती द्यावी, अशा सूचना  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्री कु. तटकरे यांनी आज मंत्रालयात लेक लाडकी योजनेचा राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी महिला बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ज्या जिल्ह्यात अर्जाची संख्या कमी आहे तिथे विविध माध्यमातून जनजागृती करून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या.

‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दिला जातो. या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाते आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतात अशाप्रकारे एकूण १ लाख १ हजार रुपये देण्यात येणार आहे.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here