राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

0
5

मुंबई, दि. 13 : उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बजूस, स्टार वेल्डींग वर्क्सच्या समोर, तळोजे पाचनंद, तळोजे नवी मुंबई येथे कारवाई करीत 1 कोटी रूपये किंमतीचा अंमली पदार्थ गांजा जप्त केला. या कारवाईमध्ये आरिफ जाकीर शेख (वय 25 वर्ष) व परवेझ बाबुअली शेख (वय 29) दोन्ही रा. सायन कोळीवाडा मुंबई यांच्याविरूद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये आंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे.

या गुन्ह्यातील आरोपींकडून पांढऱ्या रंगाच्या नॉयलॉन गोण्यामध्ये 414 किलो 1 कोटी 13 लाख 90 हजार रूपये किंमतीचा गांजा मिळून आला आहे. त्याचबरोबर वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एनडीपीएस (नॉर्कोटीक्स ड्रग अँड सायकोट्रॉपीक सबस्टान्सेस ॲक्ट) कायद्यान्वये जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, रायगड अधीक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक उत्तम आव्हाळ, आर. डी पाटणे, दुय्यम निरीक्षक डी. सी लाडके, एन. जी. निकम, प्रवीण माने, सहायक दुय्यम निरीक्षक जी. सी. पालवे, तसेच जवान श्रीमती आर. डी. कांबळे, श्रीमती निशा ठाकूर, ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास अधिक्षक श्री. कोले यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे करीत आहेत, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here