मौजे हिरज येथील रेशीम कोष बाजारपेठेमुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार
पालकमंत्री यांच्या हस्ते रेशीम कोष बाजारपेठ इमारत परिसरात वृक्षारोपण
सोलापूर, दि. 19 (जिमाका) :- कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत असून शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांऐवजी कमी संसाधनात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन पिकांचे प्रयोग शेतात राबवले गेले पाहिजेत. तुती लागवड किंवा रेशीम उत्पादन हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आलेला असून रेशीम शेतीमध्ये राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. राज्य शासन ही रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
रेशीम कोष बाजारपेठ मौजे हिरज- रेशीम पार्क इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित रेशीम शेतकरी कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख, उपसचिव श्रध्दा कोचरेकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रकाश महानवर, प्रादेशिक सहायक संचालक कविता देशपांडे, आत्माचे प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, रेशीम विभागाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने, रेशीम विकास अधिकारी विनित पवार, एम. ए. कट्टे, रेशीम उत्पादक शेतकरी आदि उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी रेशीम उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नव तंत्रज्ञानाचा वापर करून आपली आर्थिक उन्नती घडवून आणावी यासाठी कृषी विभाग व सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी. कृषी संलग्न नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शासन स्तरावर सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असून यासाठी आवश्यक असलेले प्रस्ताव यंत्रणांनी त्वरित सादर करावेत असेही त्यांनी सूचित केले.
तसेच हिरज येथील रेशीम बाजारपेठेमुळे सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील अन्य जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली असून याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळणार आहे. शासन ही महारेशीम अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तुती लागवडी बाबत जागृती करत आहे. जिल्ह्यासह राज्यातील सर्व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या अनुषंगाने प्रलंबित असलेले प्रस्ताव शासन स्तरावरून त्वरित निकाली काढण्याचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. शासन खंबीरपणे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यावेळी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील वातावरण डाळींब व रेशीम उत्पादनासाठी फायदेशीर आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या आहेत. रेशीम अनुदानाचे प्रलंबित प्रस्ताव लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत रेशीम उद्योगास चालना मिळण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी रेशीम बाजारपेठ कार्यान्वित केली असून आता शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच रेशीम उद्योगास मनरेगा योजना लागू असल्यामुळे शेतकऱ्यांनी जॉब कार्ड काढून घ्यावेत अशी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले.
रेशीम विभागाचे उपसंचालक श्री. ढवळे यांनी तसेच रेशीम उत्पादक शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रेशीम उद्योग पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झाले. प्रारंभी दीप प्रज्वलन करून व कोनसिला अनावरण करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रेशीम मार्गदर्शन कार्यशाळा तसेच रेशीम बाजारपेठ इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या इमारतीच्या परिसरात पालकमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेशीम विकास अधिकारी विनित पवार यांनी केले. आभार प्रदर्शन व समारोप श्री. कट्टे यांनी केले.
**