अमरावती, दि. 21 : मानवी जीवनात योगासनाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगसाधना करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले.
दहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाच्या आयोजनातून योग दिन सादरा करण्यात आला. योग शिक्षक मनिष देशमुख यांनी यावेळी उपस्थितांनी योग व ध्यानसाधनेचे फायदे सांगून योग प्रात्यक्षिके सादर केलीत. उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, राजू फडके, रमेश आडे, संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी, राजेश आग्रेकर यांच्यासह आयुक्तालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आजची आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगसाधनेचा समावेश करणे आवश्यक आहे. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मन:शांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक आहे. असे योग शिक्षक श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. त्यांनी योगसाधनेचे महत्व व विविध फायदे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करुन योगासनाची प्रात्यक्षिके सादर केलीत. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केलीत.
प्रारंभी प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली. यावेळी योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोम, नाडी शोधन क्रिया, भ्रामरी हे योग प्रकार करुन घेण्यात आले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. यावेळी योग शिक्षक श्री. देशमुख यांचा विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्याहस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार श्याम देशमुख यांनी यावेळी केले.
0000