चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. २२ (जि.मा.का.) : चिंतामणीनगर (माधवनगर रोड) येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी पूर्ण करावे, अशा  सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

चिंतामणीनगर येथील उड्डाण पुलाचे कामासंदर्भात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, रेल्वेचे कार्यकारी अभियंता श्री. शिंदे यांच्यासह चिंतामणीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, या पुलाचे कामकाज संथ गतीने होत असल्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच वाहतुकीचीही मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाचे काम संबंधित यंत्रणेने 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावे. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्याकडील निधी रेल्वे विभागाला वर्ग करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत दिल्या.

०००