‘बार्टी’मार्फत अजा प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0
16

ठाणे,दि.२५ (जिमाका): डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत सन 2024-25 या वर्षाकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना www.barti.in या संकेतस्थळावरुन दिलेल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दि. 3 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार असून, विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या दि. 30 ऑक्टोबर 2023 शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार बार्टी मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच बँकिंग (IBPS), रेल्वे. एलआयसी, इ.व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षण व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण या विविध स्पर्धा परीक्षांचे खाजगी नामांकित व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे रु.13,000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे रु.10,000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे.

बँकिंग (IBPS), रेल्वे, एलआयसी, इ. व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा रु.6000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थी निवड ही ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे होणार असल्याचेही बार्टीचे महासंचालक श्री. वारे यांनी सांगितले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here