राज्यपालांच्या उपस्थितीत युरोप दिन साजरा

मुंबई, दि.२६ : भारत व युरोपीय देशांचे संबंध अनेक शतकांपासून चालत आले आहेत. भारतीय राज्यघटनेत अनेक युरोपीय देशांच्या राज्यघटनांची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.  भारताची अर्थव्यवस्था सातत्याने वाढत असून युरोपीय  राष्ट्रांनी उद्योग, व्यापाराशिवाय आता भारतातील आणि विशेषतः राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे, आपल्या विद्यापीठांमध्ये भारतविषयक अभ्यासक्रम राबवावेत असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध देशांच्या वाणिज्यदूतांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २५) मुंबई येथे ‘युरोप दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 ‘द काउंसिल ऑफ युरोपियन युनियन (ईयू) चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया’तर्फे या भारत – युरोप व्यापार वृद्धीसाठी कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे युरोप दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले, भारत आज जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणूनही उदयास आले आहे. वाढती वृद्ध लोकसंख्या असलेले जगातील प्रगत देश त्यांच्या कुशल मनुष्यबळाच्या गरजेसाठी भारताकडे पाहत आहेत. भारतात कार्यरत असलेल्या युरोपीय कंपन्यांनी युवकांच्या कौशल्यवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावल्यास त्याचा फायदा भारताइतकाच युरोपियन देशांनाही होणार आहे.

विद्यापीठांशी सहकार्य वाढवताना युरोपमधील देशांनी आपापल्या विद्यापीठांमध्ये ‘इंडॉलॉजी’ सारखे अभ्यासक्रम राबवावे तसेच संस्कृत भाषेसह हिंदी व इतर भारतीय भाषांच्या अध्ययन – अध्यापनाला चालना द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करुन राज्यपाल श्री.बैस म्हणाले,   भारतीय स्वातंत्र्य चळवळ फ्रेंच राज्यक्रांतीच्या ‘स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता’ या ब्रीद वाक्याने प्रेरित होती. देशाच्या राज्यघटनेने ब्रिटिश, आयरिश, फ्रेंच, जर्मन आणि इतर राज्यघटनांमधूनही काही वैशिष्ट्ये घेतली आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांनी तसेच सामायिक मूल्यांनी भारत युरोपियन राष्ट्रांशी जोडले आहे. भिन्न राष्ट्रे, परस्पर सीमा व मतभेदांवर मात करून समान ध्येयांसाठी कसे एकत्र काम करू शकतात याचे युरोपियन संघ उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आज युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याचप्रमाणे भारत देखील युरोपियन युनियनसाठी नववा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवले असून देशाची अर्थव्यवस्था चांगल्या गतीने वाढत आहे. त्यामुळे आपले आर्थिक संबंध अधिक दृढ आणि सुधारण्यासाठी सध्याची योग्य वेळ आहे, असे राज्यपालांनी नमूद केले.

भारत आणि युरोपियन संघ यांच्यात ‘मुक्त व्यापार करार’ करण्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. या करारामुळे व्यापारातील अडचणी कमी करण्यात मदत होईल आणि वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळेल. युरोपमधील देशांना भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता युरोपीय देशांमधून देखील अधिकाधिक पर्यटक भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत भारतीय चित्रपट उद्योगाच्या शक्तीचा पर्यटन वाढविण्यासाठी उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी भारतात भव्य ‘युरोपियन युनियन’ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे. तसेच ‘नमस्ते इंडिया’ आणि ‘महाराष्ट्र महोत्सव’ हे कार्यक्रम युरोपियन युनियन देशांमध्येही आयोजित करावे, असे राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले.

युरोपियन युनियन देशांच्या ४५०० कंपन्या भारतात कार्यरत असून त्या एकूण ६० लाख लोकांना रोजगार देत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात भारत – युरोपियन युनियन संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर यांनी व्यक्त केला. युरोपियन युनियन चेम्बर्सचे अध्यक्ष पियुष कौशिक यांनी चेम्बर्सच्या कार्याची माहिती दिली, तर संचालिका डॉ. रेणू शोम यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाला चित्रपट निर्माते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, युरोपियन युनियन चेम्बर्सचे उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जी यांसह व्यापार व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor presides over Europe Day Celebrations

            Mumbai 26 : Maharashtra Governor Ramesh Bais presided over the Europe Day celebrations organised by the Council of European Union (EU) Chambers of Commerce in India at Hotel Taj Mahal Palace Mumbai on Tue (25 Jun). The Chamber founded in 1992 promotes trade and economic relations between India and EU countries.

            Stating that India’s relations with European Union countries date back to several centuries, Governor Ramesh Bais called for enhancing inter university collaboration between universities in EU countries and those in Maharashtra. He expressed the need to promote Indology and Sanskrit studies in EU universities.

            Addl Chief Secretary Manisha Mhaiskar, Film Director and Producer Rakeysh Omprakash Mehra, President of EU Chambers Piyush Kaushik, Vice President Robin Banerjee, Director Dr Renu Shome and Consuls and trade representatives of various countries were present.

०००