कठीण परिस्थितीत मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा -मुख्य सचिव डॉ.नितीन करीर

0
13

मुंबई, दि.२८ : आयुष्यात कठीण परिस्थितीत मध्यम मार्ग साधता आला पाहिजे. मी तसाच प्रयत्न करतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सर्वांनी तसा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी केले.

मुख्य सचिव डॉ. करीर 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना आज निरोप देण्यात आला. याप्रसंगी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.करीर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

डॉ.करीर म्हणाले की, मनुष्याला आयुष्यभर शिकणार आहोत याची जाणीव असणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोनामुळे 36 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत अनेक चांगले अनुभव माझ्या गाठिशी असून त्याच बळावर माझ्यात पुढील आयुष्य नव्याने सुरू करण्याची ऊर्मी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच मंत्रालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी यावेळी बोलताना अनुभव कथन केले. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कामाचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो असे सांगितले. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी नितिन करीर हे राज्याचे हित पाहणारा, सर्वांना मदत करणारा, अडचणीतून मार्ग काढण्याची हातोटी असणारा आणि प्रत्येकाला त्यांच्यासारखे व्हावे वाटावा असा एक ब्रॅण्ड असल्याचे सांगितले. सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी खंबीर नेतृत्व असा उल्लेख केला, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी कार्यक्षम आणि काम सहज, सोपे करण्याची पद्धत माहीत असणारा प्रशासक अशा शब्दात डॉ.करीर यांचा गौरव केला. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.गोविंदराज यांनी कुणाला काय देता येईल याचा विचार करणारे सकारात्मक व्यक्तिमत्व अशा शब्दात तर मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी शांत, संयमी स्वभावाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व अशा शब्दात डॉ.करीर यांच्या कार्याचा गौरव केला. जागतिक वारसा स्थळे जाहीर होण्यामध्ये डॉ.करीर यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सरिता वांदेकर देशमुख, संजय इंगळे, अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्यासह उपस्थितांनीही मुख्य सचिव डॉ.करीर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here