ठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सोपी व सुलभ कार्यप्रणाली राबविणार – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई, दि.12 : बांधकाम व्यवसायाला कर्ज देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया व  काही राष्ट्रीयकृत बँका प्राधान्य देत नाहीत. म्हणून पंजाब नॅशनल बँक किंवा इतर राष्ट्रीयकृत बँकांचे अध्यक्षांबरोबर चर्चा करण्यात येईल व झोपडपट्टी धारकांच्या इमारतींसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

    

ठाणे शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी शिवशाही प्रकल्प व बँकेकडून कर्ज मिळण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. आव्हाड  बोलत होते.

   

ही कार्यप्रणाली निश्चित झाल्यानंतर ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना सोप्या पद्धतीने व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होईल व या प्रकल्पांना संजीवनी मिळण्यास मोठी मदत होणार आहे .

         

यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, स्लम डेव्हलपर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन फॉर एमएमआर चे अध्यक्ष मुस्ताक शेख, पदाधिकारी धरम कटारिया, अनिल मुथा, वास्तुविशारद निलेश सावंत तसेच गृहनिर्माण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

देवेंद्र पाटील/विसंअ/12.3.2020