पुणे, दि.१ : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी ’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा पुणे विभागीय शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आला. या उपक्रमासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, आरोग्य सहसंचालक डॉ.राधाकृष्ण पवार, आरोग्य उपसंचालक डॉ.कैलास बावीस्कर, सहायक संचालक डॉ.संजय जठार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.महाजन यांनी आरोग्य वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. त्यांच्या हस्ते आरोग्य कीटचे वाटपही करण्यात आले. यानंतर त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांना आरोग्य कीटचे वाटप केले.
आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. राज्यभरातील संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या माध्यमातून 30 जूनपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाने १ लाख १२ हजार ६६८ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली आहे.
पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी विभागाचे ६ हजार ३६८ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.
पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ असणार आहे. यासह ताप, सर्दी, खोकला, ड्रेसींग, जुलाबाचा त्रास कोणाला होत असेल तर त्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका (बाईक अॅम्बुलन्स) तैनात ठेवण्यात येणार आहेत. कोणालाही काही त्रास झाल्यास गर्दीतही त्वरित आरोग्य सेवा देणे यामुळे शक्य होणार आहे. या फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत असणार आहेत. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात येणार आहे. महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
000