महाराष्ट्राला समृद्ध बनविण्यासाठी वसंतराव नाईक यांचा मोठा वाटा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.1 (जिमाका) : वसंतराव नाईक यांच्या कर्तृत्वाची उंची फार मोठी आहे, ती कुणालाही गाठता येणार नाही. त्यांचे कार्य आणि विचारांच्या प्रेरणेने आणि त्यांनी दाखविलेल्या वाटेवर आम्ही दहा पावले जरी चाललो तरी धन्य होऊ. महाराष्ट्राला समृद्ध आणि संपन्न बनविण्यासाठी नाईक साहेबांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हा परिषद सभागृहात वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभागाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डाँ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डांबरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, मोहिम अधिकारी प्रवीण जाधव, ईसार संस्थेचे अध्यक्ष दिवाकर भोयर, सिजेंटा इंडिया प्रा.लि.कंपनीचे प्रतिनिधी साहिल गुप्ता तसेच प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

नाईक साहेबांनी महाराष्ट्र उभा करतांना राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांचे योगदान महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. त्यांना हरीतक्रांतीचे प्रणेते म्हणतात. महाराष्ट्र अन्नधान्याने समृद्ध झाला पाहिजे, समृद्ध झाला नाही तर फासावर जाईल, अशी प्रतिज्ञा करणारे नाईक साहेब एकमेव मुख्यमंत्री आहे. नाईक साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जायचे, शेतकऱ्यांशी संवाद साधायचे, चर्चा करायचे. राज्य शासन त्यांच्या विचारांना पुढे नेत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिलासा देण्याचे काम करत असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

जिल्हाधिकारी डाँ.पंकज आशिया म्हणाले, शेतीतील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. नवनवीन प्रयोगाद्वारे राज्याच्या कृषी उत्पादनात आपल्या जिल्ह्याचा वाटा वाढला पाहिजे. प्रगतशील शेतकऱ्यांनी यासाठी योगदान द्यावे. पीएमएफएमई, रेशीम शेती, एफपीओ तसेच विविध पिकांसाठी टारगेटेड काम केले तर आपण यात यशस्वी होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

कृषी दिनी शेतीचे उत्पन्न वाढवणे, देशाच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावणे, प्रक्रिया उद्योग वाढवणे आणि पर्यायाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे आपले उद्दिष्ट आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीस वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पालकमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सिंजेंटा इंडिया प्रा.लि.कंपनीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आवारात वृक्षारोपण करण्यात आले. शेतकऱ्यांना फवारणी किटचे वाटप करण्यात आले. २०२२-२३ मध्ये झालेल्या पिक स्पर्धेत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांच्याहस्ते जनजागृती चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र माळोदे यांनी केले. संचलन मृणालीनी दहिकर यांनी केले तर आभार प्रवीण जाधव यांनी मानले.

000