लोकभावना विचारात घेऊन दीक्षाभूमी येथील भूमिगत वाहनतळ कामाला स्थगिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

0
12

मुंबई,  दि. 1 : नागपूर येथील दीक्षाभूमी विकास आराखडा हा दीक्षाभूमी स्मारक समितीने अंतिम केला आहे. त्यासाठी राज्य शासनाने केवळ निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र,  त्याठिकाणी होत असलेल्या भूमिगत वाहनतळाला काही जणांचा विरोध होत आहे. लोकभावना विचारात घेऊन या कामाला स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य डॉ. नितीन राऊत आणि नारायण कुचे यांनी यासंदर्भात सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, दीक्षाभूमी हे संपूर्ण देशासाठीचे स्मारक आहे. तेथील विकासकामे करण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीने विकास आराखडा अंतिम केला आहे. त्यानुसार तेथे कामे सुरू आहेत. मात्र, अशा विकास कामांमध्ये मतमतांतरे असणे योग्य नाही. त्यामुळे याप्रकरणी आंदोलन करणारे आंदोलक आणि स्मारक समिती यांची एकत्रित बैठक घेतली जाईल. तोपर्यंत भूमिगत वाहनतळ कामाला स्थगिती देत आहे. याबाबत, एकत्रित बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here