विधानसभा प्रश्नोत्तरे

0
8

एसटी महामंडळाला सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २ : कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते देण्यासाठी महामंडळाला शासनाकडे मदत मागायची गरज पडू नये यासाठी महामंडळाला अधिकाधिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

एसटी महामंडळाबाबत सदस्य कृष्णा गजबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, महामंडळाच्या ताफ्यात ५,१५० नवीन इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मागणीनुसार सर्व आगारांना बस देण्यात येत आहेत. बी. एस. मानकाच्या २ हजार ४२० बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच १ हजार जुन्या डिझेल बस सीएनजीवर आणि ५ हजार बस एलएनजी (लिक्विड नॅचरल गॅस ) वर रूपांतरित करण्यात येत आहे. यामुळे डिझेल व दुरुस्तीवरील खर्चात बचत होणार आहे. शासनाने महामंडळाला विद्यार्थी प्रवास सवलत योजनेपोटी ८३७ कोटी, अमृत ज्येष्ठ नागरिक विनामूल्य प्रवास सवलत योजनेसाठी १ हजार १२४ कोटी, महिला सन्मान योजनेकरिता १ हजार ६०५ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक अमृत योजना आणि विद्यार्थी प्रवास सवलत योजना यामधून शासन महामंडळाला प्रतिपूर्तीपोटी कोट्यवधींचा निधी देत आहे.

महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १०  तारखेच्या आत करण्यात येत आहे. मागील काळात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर शासनाने आंदोलनकर्त्यांसमवेत समवेत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे आंदोलन स्थगित झाले. शासनाने वेतन, भत्ते, वेतनवाढ, बोनस, महागाई भत्ता याबाबत मागण्या पूर्ण करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या दोन बैठका झालेल्या आहेत. या समितीने अहवाल दिल्यानंतर अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या प्रश्नावरील चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, बच्चू कडू, रोहित पवार, विश्वजित कदम यांनी भाग घेतला.

०००

निलेश तायडे/विसंअ/

चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील चवदार तळ्यातील  पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी 65 कोटी रुपयांचा आणि चवदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 7 कोटी रुपयांचा असा एकूण 72 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. नवीन प्रस्तावानुसार चवदार तळ्याशी संबंधित संपूर्ण विकास कामे करण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अनिल देशमुख, किशोर जोरगेवार यांनीही यावेळी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी सध्या ऑरगॅनिक बायोटेक या कंपनीकडून दरमहा मायक्रोबाएबल कल्चरचे मिश्रण तलावात सोडून पाणी शुद्धीकरण केले जात आहे. ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित असून अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या धर्तीवर ओझोनवर आधारित प्रक्रिया करुन चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाला 15 दिवसांत उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.

महाड शहरातील चवदार तळ्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असून त्याची देखभाल व दुरुस्ती नगरपरिषदेच्या स्व-निधीतून व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी प्रथमच शासकीय जयंती साजरी करण्यात आली असून तेथे स्मारक उभारणार असल्याची माहिती मंत्री श्री.सामंत यांनी सभागृहात दिली.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here