ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना दिलासा; उमेदवारी अर्जासाठी असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्राच्या अटीमध्ये सूट – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

0
3

मुंबई, दि. 12 :  जातवैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करु न शकणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. आता त्यांना जातपडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तरी निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. राज्य विधानसभेनंतर विधानपरिषदेने याबाबतचे ग्रामविकास सुधारणा विधेयक बुधवारी एकमताने मंजूर केले. त्यानंतर राज्यपालांनीही या सुधारणेस मान्यता दिली असून अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

काल याबाबतचे विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत  मांडण्यात आले होते.

या सुटीचा लाभ घेऊन उमेदवारी अर्ज भरलेला संबंधित उमेदवार निवडून आल्यास पुढील वर्षभरात त्याला जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

सध्या राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. निवडणुकीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना जातपडताळणी प्रमाणपत्र देणे सध्या बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस आहेत. इतक्या कमी काळात त्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही. आता संमत झालेल्या या विधेयकानुसार अर्ज भरल्याचे टोकन किंवा सत्य प्रत दाखवली तर उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरता येईल, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना याचा लाभ होणार आहे व त्यांचा निवडणुकीचा हक्क डावलला जाणार नाही, असे ते म्हणाले.

0000

इरशाद बागवान/विसंअ/12.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here