विधानसभा लक्षवेधी

0
9

ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रेथरेन ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर उद्यानाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ०४ : डहाणू शहरातील मौजे मल्याण येथील जनरल ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रेथरेन ट्रस्टच्या मालकीच्या जागेवरील दोन इमारती अत्यंत धोकादायक झालेल्या होत्या. या इमारतींच्या शेजारी लोकांची वर्दळ व वास्तव्य असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या  दोन इमारती  डहाणू नगर परिषदेने निष्कासित करण्याची कारवाई सुरु केली आहे. या इमारतीच्या जागेवर उद्यान करण्याबाबत प्रस्ताव डहाणू नगरपालिकेने पाठवण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

याबाबत सदस्य विनोद निकोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरी, राजेश पाटील, रईस शेख यांनीही सहभाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, डहाणू नगरपरिषदेने धोकादायक घोषित केलेल्या कोणत्याही मालमत्ता ऐतिहासिक स्वरूपाच्या नसून नगरपरिषद हद्दीतील एकही इमारत ऐतिहासिक इमारतींच्या यादीमध्ये समाविष्ट नाही. या सर्व जीर्ण इमारती खासगी मालकीच्या असून घरमालक व भाडेकरूंच्या वादामध्ये या इमारतींची वर्षानुवर्षे दुरुस्ती, डागडुजी करण्यात आलेली नाही. डहाणू शहराची मंजूर विकास योजना, अधिनियमातील तरतुदी व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नगरपरिषदेने कारवाई केली असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

पिंपरी – चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या हद्दीतील भूखंड फ्री होल्डबाबत तपासणी करून निर्णय घेणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 4 : राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेवर आर्थिक भार येत नसल्याची तपासणी करुनच पिंपरी – चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या हद्दीतील भूखंड  मालमत्ता ‘फ्री होल्ड’ करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

याबाबत सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य माधुरी मिसाळ यांनीही सहभाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या विकसित भूखंडाच्या अनुषंगाने भूखंडाची हस्तांतरणाबाबतची, मयत भूखंड धारकाचे वारस अभिलेखावर घेण्याची त्याचप्रमाणे वित्तीय संस्थेला ना हरकत देण्याची कार्यवाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रचलित नियमानुसार विहीत मुदतीत करण्यात येत आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

नागरी क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण तयार करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 4 : राज्यात नागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे संकलन करण्यात येते. प्रत्येक शहरात कचरा निर्मूलनात वाढ झाली असून कचऱ्याचे संकलन वाढले आहे. ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात येऊन कचरा उचलण्यात येत आहे. राज्यात नागरी क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्वंकष धोरण तयार येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

यासंदर्भात सदस्य अमित देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या उत्तरात सदस्य प्राजक्त तनपुरे, मनीषा चौधरी, राहुल पाटील, आदित्य ठाकरे, धीरज देशमुख यांनी भाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नगर पंचायती, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व नागरी क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाचा धोरणात समावेश असेल. तसेच मोठ्या गावांतील कचऱ्याबाबतही यामध्ये विचार करण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. लातूर शहरातील कचरा न उचलणे, अस्वच्छता, महानगरपालिकेमार्फत राबविलेली निविदा प्रक्रिया, सध्याच्या संस्थेला स्वच्छतेचे वाढवून दिलेले कंत्राट, देयकाची अदायगी याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल. सध्याच्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले असून पुढील निविदा प्रक्रियेत संस्थेला स्थान देण्यात आले नाही. लातूर शहरात ओला व सुका कचरा एकत्र गोळा करण्यात आला. यासाठी संबंधित कंत्राटदार संस्थेला 27 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील 15 वॉर्डमध्ये वॉर्ड अधिकारी नसल्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल. परभणी महापालिकेतील तक्रारीनुसार येथील अस्वच्छतेची चौकशी करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

सूतगिरण्यांना अनुदान तर यंत्रमाग धारकांना वीजदर सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 4 : राज्यातील सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन या सूतगिरण्यांना नवसंजीवनी देण्यासाठी सहकारी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 3 प्रमाणे 3 वर्षांकरीता वीज अनुदान व खासगी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 2 प्रमाणे वीज अनुदान देण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.

यंत्रमाग धारकांच्या अडचणी संदर्भात सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

त्यावर बोलतांना वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. यंत्रमाग धारकांना २७ एचपी पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट १ रुपये अतिरिक्त वीजदर सवलत व २७ एचपी पेक्षा जास्त परंतु २०१ पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट ०.७५ अतिरिक्त वीजदर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिन्ले मिल्स हे ग्रामीण भागातील उद्योग असून अनेक कामगार येथे काम करत आहेत. कोविड काळातील अडचणीमुळे मिल बंद झाल्याने अनेकांच्या रोजगारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही मिल सुरू करण्यासाठी  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन ही मिल सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री बच्चू कडू, अनिल देशमुख, नाना पटोले, रवी राणा, श्रीमती यामिनी जाधव, विजय देशमुख यांनी चर्चेत सहभाग घेतला.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

मुंबईतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 4 : मुंबई शहरामध्ये महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून रूग्णालये कार्यरत आहेत. या रूग्णालयांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. मुंबईतील सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी शासन गंभीर असून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात दिली.

यासंदर्भात सदस्य कॅ. तमील सेल्वन यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

अधिकची माहिती देताना मंत्री श्री.सामंत म्हणाले, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय अर्थात सायन रूग्णालयाचा पुर्नविकास दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 616 कोटीची निवीदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून कार्यादेश देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामाची 1507 कोटी रूपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रूग्णालयाच्या व्यतिरिक्त नवीन जागेवर रूग्णालय बांधण्यात येत आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले रूग्णालय सुरूच राहणार आहे. सायन रूग्णालयातील बाह्य रूग्ण विभागात दररोज 7 हजार रूग्णांची नोंदणी होते.

मंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, सायन रूग्णालयात 1000 कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, 300 वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व 450 परिचारिका कार्यरत आहे. त्याशिवाय 150 परिचारिकांची नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानकांनुसार रूग्णालयात डॉक्टरांची संख्या आहे. रूग्णालयास आवश्यक औषधांचा पुरवठा मध्यवर्ती खरेदी खात्यातून करण्यात येतो. यासाठी पालिका स्तरावर निविदा प्रक्रिया अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तोपर्यंत जुन्या कंत्राटदारांकडून पूर्वीच्याच दराने औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया लांबण्याबाबत चौकशी करण्यात येईल. नायर रूग्णालयातील दोन सी. टी स्कॅन यंत्र खरेदी करण्याबाबत आजच आदेश देण्यात येतील. ज्या भागात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करून बंद करण्यात आला असेल, सुविधा पुरविण्यात आल्या नसतील अशा ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल. केईएम रूग्णालयाला 100 वर्ष होत आहे. या रूग्णालयाच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

या सुचनेच्या चर्चेत सदस्य सुनील प्रभू, अजय चौधरी, यामिनी जाधव, आदित्य ठाकरे, मनिषा चौधरी यांनी भाग घेतला.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 

नाशिक शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 4 : नाशिक शहरात जमिनीवरील आरक्षण बदलवून बांधकाम परवानगी देण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. जमिनीवरील आरक्षण बदलण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त यांना आहेत. मात्र या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांनी आयुक्तांचे अधिकार वापरून बांधकाम परवानगी दिली आहे. त्यामुळे याप्रकरणात चौकशी करून हे बांधकाम अनधिकृत असल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

नाशिक शहरातील बांधकामाबाबत सदस्य नितेश राणे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

यासंदर्भात अधिकची माहिती देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले की, आयुक्तांचे अधिकार वापरून संबंधित जमिनीवरील आरक्षण बदलवून बांधकाम परवानगी दिलेल्या कार्यकारी अभियंता यांची 15 दिवसात चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 

मोहितेवाडी गाव हद्दीतील गॅस टँक स्फोट प्रकरणात नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 4 :  शेलपिंपळगांव मोहितेवाडी (ता. खेड, जि. पुणे) या गावाच्या हद्दीतील चाकण – शिक्रापूर रस्त्यावर मोहितेवाडी येथे 19 मे 2024 रोजी पहाटे गॅस वाहतूक करणाऱ्या गॅस टँकरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून या प्रकरणी चाकण पोलीस स्टेशनमध्ये टँकचा चालक, क्लीनर, ढाबा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीसरातील 39 घरांचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने संयुक्त पंचनामे करण्यात येत असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भात सदस्य दिलीप मोहिते – पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याबाबत राज्यातील गॅस एजन्सींच्या तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात 1 एप्रिल 2024 पासून 1186 तपासण्या करण्यात आल्या असून पुणे जिल्ह्यात 63 तसेच खेड तालुक्यात 7 तपासण्या करण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांनी गॅस वाहतूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल केलेला नाही व 8 फेब्रुवारी 2024 रोजी घडलेल्या घटनेबाबत चौकशी करुन पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 

नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात औद्योगिक गुंतवणूक वाढेल – उद्योग मंत्री उदय सामंत

राज्यात सात ठिकाणी एमआयडीसीची प्रादेशिक कार्यालये होणार

मुंबई, दि.4 : नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात नव्याने उद्योग येत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने काही उद्योग नव्याने येत असल्याची माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.        राज्यातील बारामती, अहमदनगर, अकोला, चंद्रपूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य राजेश पाडवी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. नवापूर औद्योगिक क्षेत्रात नवे उद्योग येत आहेत. येत्या काळात या औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

आदर्श पतसंस्थेसह महिला बँकेच्या ठेवीदारांना ठेवींच्या परताव्यासाठी कार्यवाही – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई, दि. 4 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना मिळण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, आदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे या संस्था अडचणीत आल्या. पतसंस्थेच्या लेखा परीक्षण आणि विशेष अहवालात अपहार, गैरव्यवहार, फसवणूक, विनाकारण कॅश क्रेडिट  कर्जवाटप आदी गंभीर बाबी समोर आल्या. याप्रकरणी ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबत सहकार विभागाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. संस्थेच्या मालकीच्या मालमत्तांपैकी ३ मालमत्तांची विक्री करण्यात आली आहे. त्यातून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सदस्य प्रकाश सोळंके, बबनराव लोणीकर, नारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here