विधानसभा प्रश्नोत्तरे 

0
7

डी-मार्ट आस्थापनेवरील अनोंदणीकृत कामगारांना कामगार कायद्याअंतर्गत विविध लाभ देणार – मंत्री सुरेश खाडे

मुंबई, दि. ०४ : डी – मार्ट यांच्या आस्थापनेमध्ये आणि त्यांच्या कंत्राटदाराकडे माथाडी कामगार व इतर असंघटित कामगार कार्यरत आहेत. यासंदर्भात विशेष पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत अनोंदणीकृत माथाडी कामगार आढळून आल्यास त्यांना नोंदीत करून घेऊन त्यांना विविध कामगार कायद्याअंतर्गत देय लाभ देण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.खाडे म्हणाले, डी मार्ट आस्थापनेची एकूण १०९ डिपार्टमेंटल स्टोअर्स व आठ वेअरहाऊस असून त्यामध्ये एकूण २३८ माथाडी कामगारांची माथाडी मंडळात नोंदणी आहे. या कामगारांची मजुरी व लेव्हीची रक्कम संबंधित मंडळामध्ये नियमित भरणा होत आहे. डी – मार्ट  अनोंदणीकृत कामगारांकडून अल्प वेतनात काम करून घेतले जाते. तसेच त्यांच्या लेव्हीची रक्कम संबंधित मंडळामध्ये नियमितपणे भरणा होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राज्यातील २८ डी मार्ट ची तपासणी केली असता ७९ माथाडी कामगार आढळून आले आहेत. या कामगारांची माथाडी मंडळात नोंद करण्यात येणार आहे. डीमार्ट मध्ये काम करणाऱ्या अनोंदणीकृत कामगारांना अल्प वेतन व लेव्हीची रक्कम नियमितपणे भरण्यात येत नसेल तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

अंजनवेल पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणार – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ०४ : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मौजे अंजनवेल गावात जलजीवन योजनेचे ७० टक्के, तर पेठ अंजनवेल या गावात जलजीवन योजनेचे १० टक्के काम झाले आहे. या योजनेसाठी ग्रामपंचायतीसाठी ७६ लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच काम पूर्ण करून ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य संजय केळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, योगेश सागर, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, कुठल्याही योजनेच्या कामासाठी  ग्रामसभेची संमती घेऊनच काम सुरू केले जाते. पाण्याच्या उद्भवासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येते. प्रमाणपत्र असल्याशिवाय पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचा उद्भव करण्यात येत नाही.

पाणीपुरवठा योजनांची कामाची संख्या जास्त असल्यामुळे एका कंत्राटदाराकडे एकापेक्षा जास्त योजनांची कामे आहेत. तालुक्यातील एकत्रित कामांची एकच निविदा काढण्यात आली होती. मात्र, न्यायालयाच्या निकालामुळे एकत्र कंत्राट न देता सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावे, यासाठी त्यांच्या कामाच्या अनुभवानुसार कंत्राट देण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनांचे देयक त्रयस्थ संस्थेकडून कामाचे अंकेक्षण केल्याशिवाय काढण्यात येत नाही. तसेच या गावातील योजनेमधील तांत्रिकदृष्ट्या त्रुटींची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. ४ : पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

ससून रुग्णालयाबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, यशोमती ठाकूर, अनिल देशमुख, विश्वजित कदम, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माधुरी मिसाळ  यांनी भाग घेतला.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ससून रुग्णालयात बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. नवजात बालकांवरील उपचारांसाठी डॉक्टरांची संख्या पुरेशी असून उपचारांसाठी अतिदक्षता विभागात खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ससूनमधील सुविधा व सद्य:स्थितीबाबत पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रूग्णालयाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.  वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही एमपीएससीमार्फत करण्यात येत आहे. गट ‘क’ मधील सर्व रिक्त पदे भरण्यात आली आहेत. गट ‘ड’ पदाची रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपात स्थानिकस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयांमध्ये औषधे खरेदीचे अधिकार अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे तातडीने औषधांची गरज असल्यास स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात येत आहेत. औषधे नसल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने तक्रार करावी.  ससूनमध्ये मागील काळात घडलेल्या गुन्ह्यांबाबत आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली आहे. या रुग्णालयात डायलिसीसची व्यवस्था करण्याबाबत पडताळणी करण्यात येईल.  यकृत बदल उपचाराची व्यवस्था मुंबईत असून पुण्यातही शासकीय रुग्णालयातही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये विषशोध यंत्रणेच्या पडताळणीसाठी समिती – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. ४: शासकीय रुग्णालयांमध्ये विषबाधा किंवा विषाशी संबंधित रुग्णांचे रक्त तपासणी करण्यात येते. रुग्णाच्या ‘क्लिनिकल’ इतिहासावरून विषारी औषधाचा शोध घेण्यात येतो. त्यानंतर उपचार करण्यात येतात. या रुग्णालयांमध्ये विषाचा प्रकार शोधणारी ‘टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत समिती नियुक्त करून यंत्रणेची पडताळणी करण्यात येईल. यंत्रणेची विश्वासार्हता तपासून सर्व रूग्णालयांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य किशोर जोरगेवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नारायण कुचे, कैलास गोरंट्याल, अमित देशमुख, सुलभा खोडके, प्रकाश आबिटकर यांनी भाग घेतला.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूरमधील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये खासगी रुग्णालयात यकृत बदलाचा प्रस्ताव आला असल्यास त्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल. लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील फर्निचर व  विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी वाद होता, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून जागा निश्चित करण्यात आली आहे.  वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णालय परिसरातील जागेवर वैद्यकीय महाविद्यालय करण्याची बाब तपासून घेऊन निर्णय घेण्यात येईल. याबाबत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयात या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करुन रुग्णालयाचे बांधकामही सुरू करण्यात येईल. राज्यातील मोठ्या शहरातील शासकीय रूग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here