विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
10

शासन दरापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 5 : तूर खरेदीसाठी शासनाने दर निश्चित केला असून यापेक्षा कमी दरात तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई केल्या जाईल, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यातील तूर बाजारभावाने खरेदी करण्याबाबत सदस्य राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.सत्तार बोलत होते.

हंगाम २०२३-२४ मधील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात नाफेडच्यावतीने पणन महासंघामार्फत तूर खरेदीकरिता  शेतकरी नोंदणी सुरु  करण्यात आली. १५३ तूर खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली असून ३ हजार ९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मात्र याठिकाणी केवळ ४६ शेतकऱ्यांनी ५५० क्विंटल माल विक्री केला आहे. तूरीचे बाजारभाव आधाराभूत भावापेक्षा जास्त असल्यामुळे तूर खरेदी झालेली नाही. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने राज्यात पी.एस.एफ योजनेतंर्गत आधारभूत भावाने तूर खरेदी करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार तूर खरेदी करण्यात येत आहे,मात्र या खरेदीस शेतकऱ्यांमार्फत प्रतिसाद मिळत नाही. मात्र मार्केट कमिटीमध्ये आलेल्या सर्वांची तूर खरेदी केली जाणार आहे, आज ही खरेदी केंद्रे सुरु आहेत. तसेच तूरीचा फेरा कमी होऊ नये यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. बाजाराभाव आणि हमी भाव यातील तफावत यातील मध्यबिंदू काढून त्या किमतीला तूर खरेदी करण्याचा विचार केला जाईल, असे पणन मंत्री यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य डॉ.वजाहत मिर्झा, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

०००

वंदना थोरात/विसंअ/

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अतिरिक्त कार्यभाराबाबत लवकरच निर्णय  मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ५ :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ४५ विभाग आहेत. त्यातील ३७ खात्यांना नियमित प्राध्यापकाकडे प्रत्येकी एकच विषय आहे.उर्वरित ८ खातेप्रमुखाकडे अतिरिक्त पदभार आहेत.यांचे पदभार कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्या विभागप्रमुखांकडे अतिरिक्त कार्यभार आहे त्याबाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर उच्च व  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ४० पदांचा कार्यभार केवळ ११ प्राध्यापकांवर सोपविला असल्याबाबत विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी सहभाग घेतला.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

सिल्लोड तालुक्यातील ३४०० रेशनकार्ड धारकांबाबत लवकरच निर्णय  मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. ५ : छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील ३४०० रेशनकार्ड धारकांबाबत लवकरच कार्यवाही करणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत सांगितले.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड तालुक्यातील ८ हजार ९२१ शेतकरी लाभार्थ्यांच्या कार्डची छाननी केली आहे. त्यापैकी १९९५ रेशन कार्डधारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. यातील १५०३ रेशन कार्ड धारकांना धान्याची मागणी केली आहे त्याप्रमाणे त्यांना धान्य वितरण करण्यात येत आहे. डीबीटीमध्ये पात्र असलेली २२८५ रेशनकार्ड धारक आहेत. जी कोणत्याच निकषात बसत नाहीत अशी १२४ कार्डधारक आहेत. ज्यामध्ये काही ना काही त्रुटी आहेत अशी ३४०० रेशनकार्ड धारक आहेत याबाबतीतही लवकरच कार्यवाही पूर्ण करून निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुजबळ म्हणाले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या हिताला प्राधान्य  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 5 : शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये शाळांसाठी अनेक नवीन सवलती  दिल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या हिताला प्राधान्य देण्याची जपण्याची शासनाची भूमिका असल्याचे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

शालेय शिक्षण विभागाच्या मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.

शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, समस्या सोडवल्या जातील. विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी, सुविधा मिळाल्या पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. यामध्ये शिक्षकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरवली जाते. मात्र काही दुर्गम, ग्रामीण भागात निकषानुसार पटसंख्या पूर्ण करणे अवघड आहे, अशा ठिकाणी पटसंख्या कमी आहे, तिथे दोन शाळा शेजारी असतील तर त्यांची मिळून पाचशे पटसंख्या होत असेल तरी त्या ठिकाणी नवीन शिक्षक देण्यात येईल. क्रिडा तसेच कार्यानुभव या विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षकांचीच नियुक्ती करणे आवश्यक असते जेणेकरुन त्या विषयांच्या अध्यापनाचा दर्जा कायम ठेवता येईल. यादृष्टीने या विषयांसाठी संबंधित शिक्षकांचीच नियुक्ती केली जाणार आहे. यातून कला, क्रीडा शिक्षकांची संख्या वाढेल. शिक्षकांवर अन्याय होऊ दिलेला नाही, यापुढे ही कधी तसं होणार नाही, अनुदानामध्ये टप्पा दोन अंतर्गत पात्र नसलेल्या शाळांनाही स्वतःची शुल्क आकारणी करता येईल, असे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

या प्रश्नावरील चर्चेत सदस्य विक्रम काळे, मनीषा कायंदे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

०००

वंदना थोरात/विसंअ/

चंद्रपूर शिक्षणाधिकारींच्या कामकाजातील अनियमतेता प्रकरणी कार्यवाही तत्परतेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 5 : चंद्रपूर शिक्षणाधिकारींच्या कामकाजात अनियमतेता प्रकरणी संबधितांना नोटीस देण्यात आली असून  आयुक्त (शिक्षण), पुणे यांच्यास्तरावरुन शिक्षणाधिकारींच्या विरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल  आठवड्याच्या आत दिला जाईल, त्यावर आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) चंद्रपूर यांच्या कामकाजातील अनियमततेची चौकशी करण्याबाबतच्या संदर्भात सदस्य सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.

विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत तपासणी समितीने शिक्षणाधिकारी  (माध्यमिक) चंद्रपुर यांच्या कार्यालयाच्या केलेल्या तपासणीत  शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांची वरिष्ठ / निवड श्रेणी, वैद्यकीय प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे व इतर अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे निर्दशनास आले आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने सुरु असेलेल्या विभागीय चौकशीचा अहवाल आठवड्याच्या आत दिला जाईल, त्यानुसार आवश्यक ती कारवाई केल्या जाणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

वंदना थोरात/विसंअ/

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here