जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न नूतन सभागृहातून मार्गी लावावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. ६ (जिमाका): महसूल हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन सभागृह खूप छान पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या सभागृहातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न गतीने मार्गी लावावेत, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकांसाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले,  विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंगराव शिंदे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सभागृह उभारण्यासाठी योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डाटा एन्ट्रीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याबद्दल कौतुक करुन पालकमंत्री श्र. मुश्रीफ म्हणाले की, या योजनेचा विनासायास लाभ महिला लाभार्थ्यांना मिळवून द्या. प्रमाणपत्र देणे अथवा अर्ज नोंदणी प्रक्रियेत दलालांचा हस्तक्षेप होवू देवू नका. जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांची नोंदणी करुन घ्या, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठीचे काम या सभागृहातून होईल. तसेच प्रलंबित विषय गतीने पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केला.

०००