बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. ९ : बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही १०० टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व मुलींची १०० टक्के फी शासन भरेल, अशी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुलींची १०० टक्के फी सरकार भरेल, यावर अनेकांनी आनंद व्यक्त करताना बिगर व्यावसायिक (Non Professional) अभ्यासक्रमांचीही (कला, वाणिज्य, विज्ञान इ.) १०० टक्के फी शासनाने भरावी, असा मुद्दा उपस्थित केला. त्या अनुषंगाने मंत्री श्री.पाटील यांनी स्पष्टीकरण केले.
राज्यात मुलींचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे प्रमाण एकूण विद्यार्थी लोकसंख्येमध्ये ३६ टक्के असून प्रगतीशील राज्यामध्ये हे प्रमाण वाढण्याची आवश्यकता विचारात घेऊन मुलींची शिक्षण फी १०० टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवड झालेल्या सदस्यांचा शपथविधी संपन्न
मुंबई, दि. ९ : विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक २०२४ मध्ये विधानपरिषदच्या पदवीधर मतदारसंघातून निवड झालेले ॲड. अनिल परब तसेच शिक्षक मतदारसंघातून निवड झालेले किशोर दराडे यांनी आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांची ओळख करून दिली.
०००
संध्या गरवारे/विसंअ/
मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानपरिषदेत संमत
मुंबई, दि. ९: विधानपरिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मांडला.मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून लालबाग रेल्वे स्थानक, सॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डोंगरी रेल्वे स्थानक, पश्चिम मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून गिरगाव रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीनचे काळी चौकी रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून माझगाव रेल्वे स्थानक, किंग्ज सर्कल स्थानकाचे नाव तिर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक याप्रमाणे बदलण्यात यावेत, अशी शिफारस महाराष्ट्र विधानपरिषद केंद्र शासनास करीत आहे, असा ठराव संमत करण्यात आला.
०००
संध्या गरवारे/विसंअ/
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकसित होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील – मंत्री चंद्रकात पाटील
मुंबई, दि. ९ : राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकसित व्हावे, व्यवसाय करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना शासन राबवत आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
यासंदर्भात विधानपरिषद नियम ९३ अन्वये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सूचना उपस्थित केली होती.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकसित करणे, व्यवसाय करण्याची आवड निर्माण करण्यासाठी ही योजना शासन राबवत आहे. या योजनेसाठी शासनाच्या दहा पॉलिटेक्निक इंजिनीअरींग कॉलेजना ५३ कोटी ६६ लाख रूपये मंजूर केले आहेत. सुविधायुक्त उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) देखील तयार करत आहोत. लवकरच हे केंद्र सुरू होईल. प्रत्येक भागाची गरज लक्षात घेवून तसे अभ्यासक्रम तयार केले जातील तसेच उपलब्ध मनुष्यबळाला सुविधायुक्त उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. कुशल मनुष्यबळ तयार होईल आणि त्यांना रोजगार देखील प्राप्त होईल, असा या योजनेचा उद्देश आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही नवीन कौशल्य विकास निर्माण करणारे अभ्यासक्रम तयार करावे, असेही सांगितले आहे. तसेच शासनाच्या योजनांची माहिती सर्व घटकापर्यंत पोहोचावी यासाठी ५० हजार योजनादूत नेमले जाणार आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना रोजगार संधी उपलब्ध करून देतानाच त्यांतर्गत हे योजनादूत नेमले जाणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत असेल. हे योजनादूत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करतील. बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर आदी तरूणांना रोजगार प्राप्त होणार आहेत, असेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.
०००
संध्या गरवारे/विसंअ/
अर्थसंकल्पात प्रत्येक विभागासाठी भरीव तरतूद – मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. ९ : देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राच्या स्थूल उत्पन्नाचा 14 टक्के वाटा असून लोकसंख्या विचारात घेता इतर राज्यांच्या तुलनेत राज्याचे उत्पन्न अधिक असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्याच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत प्रत्येक विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
विधान परिषदेत अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेविषयी माहिती देताना मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट 2024 या महिन्यांचा लाभ एकत्रित देण्यात येणार असून त्यानंतर प्रत्येक महिन्यात हा लाभ बँक खात्यात जमा करण्यात येईल. यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे.
उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, राज्यात 2,25,481 कोटींची गुंतवणूक झाली असून एक लाख 77 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. दावोस येथे 2023 मध्ये 1.37 लाख कोटींचे 19 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून एक लाख इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. 2024 मध्ये ३ लाख २३३ कोटी रुपयांचे 24 करार करण्यात आले आहेत. विदेशी थेट गुंतवणुकीत देशातील 30 टक्के गुंतवणुकीसह महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबईत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क प्रकल्प उभारण्यात येणार असून अशा प्रकारचा देशातील एकमेव प्रकल्प असणार आहे. या माध्यमातून एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
विद्यार्थ्यांना यावर्षी दोन मोफत गणवेश देण्यात येणार असून यापैकी एक गणवेश स्काऊट आणि गाईडचा गणवेश असेल. याबरोबरच एक जोडी बूट आणि दोन जोडी सॉक्स देखील देण्यात येणार आहेत. गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्थानिक बचतगटांमार्फत करण्यात येत असून यामुळे बचत गटातील सुमारे एक लाख महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. हे गणवेश 30 जुलै पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मिळतील, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे.
शाळा दत्तक घेण्याची योजना राबविण्यात येत असून यामध्ये दत्तक घेणाऱ्याचे नाव शाळेला देण्यात येणार आहे. याचबरोबर दहा वर्षांसाठी शाळांची देखभाल दुरुस्ती दत्तक घेणाऱ्यांमार्फत करण्यात येईल. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील ऐतिहासिक मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात येत आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत मिळणारा प्रतिसाद पाहता ही योजना बंद करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांबाबतच्या योजनांविषयी माहिती देताना मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. एक रुपयात पीक विमा योजना राबविली जात आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात राज्यात चांगले काम होत असून कृषी पंपांसाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंचनावरही भर देण्यात येत असून 3.65 लक्ष हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे कृषी दर वाढण्यास मदत होणार आहे. विजेची उपलब्धता वाढण्यासाठी सहा कंपन्यांसोबत दीर्घकालीन करार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
याव्यतिरिक्त अन्य योजनांची माहिती देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. आरोग्य सेवेअंतर्गत मूत्रपिंडावरील उपचारांसाठी रुग्णालयांच्या संख्येमध्ये वाढ, राज्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची संख्या वाढविण्यात येणार, सहकारी पतसंस्थांना विमा कवच देणार, इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्यात येणार, विविध विकास महामंडळांना निधीची तरतूद, तृतीय पंथीयांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/